Walmik Karad Protest
आवादा कंपनीच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्याअंतर्गत वाल्मिक कराडला पोलिसांनी अटक केली आहे. तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून कराडचे नावं सातत्याने समोर येत आहे. अशातच, माझ्या मुलाला न्या द्या म्हणत ७५ वर्षीय कराडच्या आईने पोलिस स्टेशनसमोरच ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. तसेच मुलावर दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा आहे, राजकारणामुळं मुलावर अन्यात होत असल्याचा आरोप कराडच्या आईनं केला आहे.
वाल्मिक कराडला याआधी 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली होती. आज वाल्मिक कराडला केज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. वाल्मिक कराडला सीआयडी कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच कराडच्या आईने परळी पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. तसेच, सुरेश धस,संदीप क्षीरसागर हे या प्रकरणात राजकारण करत असल्याचा आरोपदेखील उपस्थित महिलांनी केला आहे. राजकीय सूडबुद्धीने आणि जातीय द्वेषातून कारवाई होत असल्याचे मत वाल्मिक कराडच्या आईने व्यक्त केले आहे. तसेच, माझ्या मुलाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, त्याला सोडलं जात नाही तोपर्यंत इथेच ठिय्या आंदोलन करणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
देशमुख हत्याप्रकरणी कराड याच्यावर 302 आणि मोक्का लावण्याची मागणी देशमुख कुटुंबाकडून करण्यात येत आहे. अशातच, बीड जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू होणार होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जमावबंदीचे आदेश 14 जानेवारीपासून ते 28 जानेवारीपर्यंत लागू असतील.