मुंबई काँग्रेस कार्यालयावर हल्ल्याचा निषेधार्थ काँग्रेसची मंत्रालयावर निदर्शने
मुंबई: मुंबई भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेसतर्फे मंत्रालयाच्या गेटवर तीव्र निदर्शने करण्यात आली. भाजपाच्या गुंडगिरीचा निषेध करत, गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. जयभीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
काल, १९ डिसेंबर रोजी भाजपाच्या सुमारे ४० कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयावर काठ्या आणि पेव्हर ब्लॉकने हल्ला करत तोडफोड केली. यावेळी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांवरही विनयभंगाचे प्रकार झाल्याचा आणि त्यांना मारहाण करण्यात आल्याचा देखील आरोप झाला होता.
या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या गेटवर निदर्शनं केली. "अमित शहा इस्तीफा दो", "भाजपची गुंडगिरी बंद करा", "सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे" असे नारे देत परिसर काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमून सोडला.
मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते यांनी सांगितले की, "भाजपच्या हिंसेला काँग्रेस कार्यकर्ते डगमगणार नाहीत. संविधानिक मार्गाने भाजपच्या अशा भेकड हल्ल्यांना ठोस उत्तर दिले जाईल. कार्यकर्त्यांनी आता निर्धार केला आहे."
निदर्शनांदरम्यान, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष व संघटन प्रभारी प्रणिल नायर, कोषाध्यक्ष संदीप शुक्ला, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष कचरू यादव, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेले.
काँग्रेसने भाजपाच्या या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.