संग्रहित छायाचित्र
पुणे : कोथरुडमधील गुंडाकडून तीन लाखांचा गांजा जप्त करण्यात आला. अमली पदार्थ विरोधी पथकाने लोणी काळभोर भागात ही कारवाई केली. खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या या सराईताला पोलिसांनी अटक केली आहे.
साहिल विनायक जगताप (Sahil Vinayak Jagtap) (वय २८, रा. केळेवाडी, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, दोन वर्षापूर्वी आरोपी साहिल जगताप याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. नुकतीच त्याची कारागृहातून सुटका झाली होती. आरोपी जगताप हा अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. आरोपी साहिल जगताप हा अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लोणी काळभोर परिसरातील टोलनाक्याजवळ सापळा लावला. त्याठिकाणी पोलिसांनी जगताप याला अटक केली. त्याच्याकडे असलेल्या पिशवीत तीन लाख रुपये किमतीचा गांजा आढळून आला. दरम्यान, त्याने गांजा कुठून आणला? तसेच तो कोणाला गांजाची विक्री करणार होता? या दिशेने पोलिसांकडून तपास केला जात आहे.
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक शशिकांत खोसे, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर यांनी ही कारवाई केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.