संग्रहित छायाचित्र
पुणे : दिवाळी सणाच्या अनुषंगाने सराफी बाजारात सध्या मोठी उलाढाल सुरू आह. त्यामुळे विविध सराफी पेढ्यांमध्ये जाऊन सोन्याची विक्री करण्यासाठी दिलेले एक कोटी १५ लाख ४२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने (Pune Crime News) घेऊन सेल्समन पसार झाला. ही घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रविवार पेठेत घडली. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रम अमृतलाल बाफना (रा. भिक्षु सदन, प्रेम कुमार शर्मा रस्ता, माधवबाग जवळ, गिरगाव, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी जितेंद्र धनराज सोनीग्रा (वय ४५,रा. मॅरीगोल्ड बिल्डिंग, सॅलीसबरी पार्क, गुलटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र सोनिग्रा यांचा रविवार पेठेमध्ये सोनिग्रा ज्वेलर्स नावाने मागील पन्नास वर्षांपासूनचा कौटुंबिक सराफी व्यवसाय आहे. आरोपी विक्रम बाफना याला नोकरीची गरज होती. त्याचे दाजी आणि सोनिग्रा यांची मैत्री आहे. बाफनाच्या दाजींनीच त्याला सोनिग्रा यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले होते. ओळखीमधून आल्यामुळे त्यांनी जुलै महिन्यामध्ये कामावर ठेवले.
तो जुलै महिन्यापासून त्यांच्या सराफी पेढीमध्ये काम करीत होता. सोनिग्रा यांच्या सराफी पेढीमध्ये विविध प्रकारचे सोन्याचे दागिने तयार करून त्याची शहरातील विविध सराफी व्यवसायिकांना विक्री केली जाते. १ ऑक्टोबर रोजी सोनिग्रा यांनी बाफनाकडे २२ कॅरेट सोन्याच्या २२५ साखळ्या विविध दुकानांमध्ये विक्री करण्यासाठी दिल्या होत्या. त्याच्याकडे विश्वासाने सोपवलेला हा सर्व मुद्देमाल घेऊन तो पळून गेला. बराच काळ त्याची वाट पाहिल्यानंतर देखील तो परत न आल्यामुळे सोनिग्रा यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. अन्य कामगारांना देखील त्यांनी त्याला शोधायला पाठवले. यासोबतच विविध व्यापारांकडे त्यांनी बाफना साखळीची विक्री करण्यासाठी आला होता का? या संदर्भात माहिती घेतली. परंतु, तो कोणाकडे न जाता पसार झाला होता.
त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीचा शोध घेण्यात येत असून त्याला लवकरच अटक केली जाईल, असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.