Vanraj Andekar Murder Case : वनराज आंदेकर हत्या प्रकरण; खूनामागील हेतू काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा आरोपींनी नियोजनबद्ध कट रचून निर्घृण खून केला आहे. आंदेकर यांचा खून कौटुंबिक, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा संशय असून, त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र अटक आरोपींनी आंदेकर यांचा कोणत्या हेतूने खून केला, हे स्पष्ट झालेले नसून पोलीस या गुन्ह्यामागील कारणांचा शोध घेत आहेत.
आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ सयाजी गायकवाड (वय ४१, रा. धनकवडी) असल्याचा संशय पोलिसांना असून, गायकवाडसह आंदेकरांची बहीण संजीवनी जयंत कोमकर (वय ४४) आणि तिचा दीर प्रकाश लक्ष्मण कोमकर (वय ५१, दोघेही रा. नानापेठ) यांना सोमवारी (ता.२) रात्री अटक करण्यात आली आहे. तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी नऊ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश मंगळवारी (दि. ३) दिला.
वनराज आंदेकर यांचा रविवारी रात्री (दि. १) नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. ‘‘आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून यात आणखी काही आरोपींना अटक करायची आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे तपास करून पाहिजे आरोपींना अटक करता येवू शकते. त्यामुळे आरोपींना पोलीस कोठडी देण्यात यावी,’’ अशी मागणी सरकारी वकील निलिमा इथापे-यादव यांनी केली. आरोपींतर्फे अॅड. पुष्कर पाटील, अॅड. ऋतुराज पासलकर आणि अॅड. आर. आर. पाटील यांनी काम पाहिले.
तीन सख्ख्या भावांना अटक
आंदेकर खून प्रकरणात मंगळवार संध्याकाळपर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील तीन आरोपी हे सख्खे भाऊ आहेत. जयंत लक्ष्मण कोमकर (वय ५२, भवानी पेठ), प्रकाश लक्ष्मण कोमकर (वय ५१, रा. नानापेठ) आणि गणेश लक्ष्मण कोमकर (वय ३७, रा. भवानी पेठ) अशी या भावांची नावे आहेत. तर जयंत यांची पत्नी संजीवनी हिलादेखील या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.