पवार कुटुंबीय आणि सांगोल्याचे आमदार नातेवाईक असल्याचे सांगत गंडवले; पती-पत्नी असलेल्या बंटी-बबलीने लुटले लाखो रुपये

पवार कुटुंबीय आणि सांगोल्याचे आमदार आपले नातलग असून मंत्रालयात आणि मंत्र्यांसोबत ओळख असल्याची बतावणी करीत महसूल विभागात नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणाला २८ लाख ७८ हजार रुपयांना गंडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

संग्रहित छायाचित्र

मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवत सहायक लिपिकपदाचे दिले बनावट नियुक्तीपत्र

पवार कुटुंबीय आणि सांगोल्याचे आमदार आपले नातलग असून मंत्रालयात आणि मंत्र्यांसोबत ओळख असल्याची बतावणी करीत महसूल विभागात नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणाला २८ लाख ७८ हजार रुपयांना गंडवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

हा प्रकार २६ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२४ या कालावधीत विमाननगर येथे घडला. सदर तरुणाला मंत्रालयात नेऊन आमदार निवांसात काही आमदारांची भेटदेखील घालून देण्यात आली. त्याला महाराष्ट्र शासनाचे बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले. हा प्रकार उघड होताच विमाननगरमधील एका हॉटेलचे बिल न भरताच आणि चेकआऊट न करताच पती-पत्नी असलेले हे बंटी-बबली पसार झाले आहेत. या प्रकरणी विमाननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सिद्धार्थ देविदास झेंडे (Siddharth Devidas Zende) (वय ३५, रा. म्हसोबावाडी, इंदापूर) आणि सीमा सिद्धार्थ झेंडे (Sima Siddharth Zende) अशी गुन्हा दाखल झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. या प्रकरणी समाधान रमेश सोनवणे (वय ३३, रा. कांचन बिल्डिंगसमोर, महादेवनगर, ऊरुळी कांचन) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनवणे हे मॅग्नस स्क्वेअर बिझनेस हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी करतात. २० फेब्रुवारी २०२४ रोजी ते हॉटेलमध्ये कामावर असताना सिद्धार्थ झेंडे हा हॉटेलमध्ये आला. सोनावणे यांची विचारपूस करीत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकारी, तहसीलदार, सरकारी अधिकारी यांच्या बदल्या मंत्रालयातून करून देत असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा २० फेब्रुवारी ते १५ मार्च २०२४ या कालावधीत हॉटेलमध्ये झेंडे राहण्यास होता. त्याने सोनवणे यांना महसूल खात्यात मोठ्या पदावर नोकरी लावून देण्याचे आणि महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिसमध्ये सहायक लिपिक म्हणून पदावर नेमणून करून देतो अशी बतावणी केली. त्याकरिता शासनाची लेखी परीक्षा अगर तोंडी परीक्षा देण्याची गरज नसल्याचे सांगितले. कोणत्याही स्थितीत मंत्रालयामधून नोकरीची ऑर्डर काढून देतो, मला महसूल विभागातील ८४ रिक्त पदे भरण्याचे टार्गेट देण्यात आल्याचे सांगितले. तसेच, पवार कुटुंबीय आणि सांगोल्याचे आमदार आपले नातलग असल्याची बतावणी केली. त्यांच्यासोबतचे फोटोदेखील दाखवले.

झेंडे याने त्याचा मोठा भाऊ तुषार याला केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याचा फोटोदेखील सोनवणे यांना दाखवला. तसेच, प्रगती बिल्डकॉन नावाची कंपनी असून पवनचक्की बसविण्याचे प्रकल्प घेत असल्याचे सांगितले. म्हसोबाची वाडी येथे मोठ्या प्रमाणावर जमीन असून या ठिकाणी अश्वमेध स्टड फार्म असल्याचे सांगितले. त्याची पत्नी एका मंत्र्यांची नातेवाईक असल्याची बतावणी केली. काही दिवसांनी त्याची पत्नीदेखील हॉटेलमध्ये राहण्यास आली होती. तिनेदेखील झेंडे फिर्यादीच्या नोकरीचे काम नक्की करून देईल, असे सांगितले होते. त्याच्या ड्रायव्हरनेदेखील झेंडच्या मंत्रालयात ओळखी असल्याचे सांगितले होते. याच काळात झेंडे सतत फिर्यादीचे शिक्षण व कागदपत्र याबाबत विचारणा करीत होता. ही कागदपत्रे त्यांच्याकडे दिल्यावर त्याने नोकरीसाठी ३० लाख रुपये लागतील, असे सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवत फिर्यादी यांनी पैसे देण्याची तयारी दर्शविली. त्यांनी फिर्यादीला मुंबईत विधान भवनाजवळ नेले. आमदार निवासात नेऊन काही आमदारांची भेट घडवून दिली. मुंबईला जाता-येताना व्हीआयपी कार्ड दाखवून टोल नाक्यावर टोल न देता गाडी नेण्यात आली. त्याच्या गाडीला आतील बाजूस सायरन बसविले होते.

झेंडेवर विश्वास बसल्याने फिर्यादी यांनी मित्र परिवार, सगे सोयरे, नातेवाईक यांच्याकडून पैशांची जुळवाजुळव करीत विविध बँक खात्यांवर तसेच रोख स्वरूपात वेळोवेळी २८ लाख ७८ हजार २०३ रुपये जमा केले. ६ मार्च रोजी झेंडे याने त्यांना साहाय्यक लिपिक पदावर रुजू होण्यासंबंधीचे महाराष्ट्र शासनाचे पत्र दिले. त्यामध्ये १२ मार्च रोजी मूळ कागदपत्रांसह रुजू होण्याबाबत नमूद केले होते. परंतु, झेंडे याने १४ मार्च रोजी जाण्याबाबत सांगितले. दरम्यान, १४ मार्च रोजी त्यांना सीमा झेंडे हिने मेसज करून एक नंबर पाठवित त्यावर फोन करण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादीने फोन केला असता तिने झेंडे हा फ्रॉड असल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळातच झेंडे याने फोन करून सीमा आणि त्याचे भांडण झाले असून ती उगाच भडकावत असल्याचे फिर्यादीला सांगितले. दुसऱ्या दिवशी झेंडे फिर्यादीला घेऊन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गेला. त्यावेळी त्याने आज काम जास्त असल्याने उद्या बोलावले असल्याची बतावणी केली. त्यानंतर, १५ मार्च रोजी फिर्यादी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन महसूल विभागात चौकशी केली. तेव्हा त्यांना अशी कोणतीही ऑर्डर शासनाने केलेली नसून त्यांना दिलेले पत्र खोटे असल्याचे स्पष्ट झाले.

गाडीच्या खरेदीतही फसवणूक

दरम्यान, झेंडे आणि त्याची पत्नी हॉटेलमधून चेकआऊट न करता तसेच बिल न भरता पसार झाले. त्याला फोनवर तसेच व्हाटसअॅपवर वेळोवेळी संपर्क साधून पैसे परत मागितले. तेव्हा, केवळ पैसे देतो, असे सांगत टाळाटाळ केली. विविध प्रलोभने देत पोलिसांत तक्रार न करण्याची विनंती केली. दरम्यान, १६ मार्च रोजी शाम धरमसिंह टमट्टा हे झेंडेचा शोध घेत हॉटेलमध्ये आले. झेंडे वापरत असलेली गाडी त्यांची होती. झेंडे याने ही गाडी खरेदी करण्यासाठी १४ लाख ५० हजार रुपये किंमत ठरवली होती.  त्यापोटी पैसे नसलेल्या खात्याचा चेक दिला होता. अशाप्रकारे त्यांचीदेखील फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर फिर्यादी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी रवींद्र ढावरे म्हणाले, फिर्यादीने तक्रार अर्ज केलेला होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू करण्यात आला असून हॉटेलमधील सीसीटीव्ही ताब्यात घेण्यात आले आहे.   

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest