नवविवाहीत दाम्पत्याचे आढळले मृतदेह
पुणे : नवविवाहीत दाम्पत्याचे मृतदेह घरामध्ये आढळून आल्याने लोहगाव परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांचे अवघ्या पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेले होते. पोलिसांनी दार तोडून घरात प्रवेश केला तेव्हा पत्नीचा मृतदेह खाटेवर पडलेला होता. तर, पतीने गळफास घेत आत्महत्या केलेली होती. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. तपासाअंती निष्कर्ष काढून पुढील गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
किरण महादेव बोबडे (वय २२) आणि आरती किरण बोबडे (वय २०, दोघेही रा. लोक व्ह्यू सोसायटी, लोहगाव) अशी मृतांची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण हा मूळचा बीड जिल्ह्यामधील माजलगाव येथील राहणारा होता. तर, आरती ही पुण्यातील रहिवासी होती. किरण टपाल विभागात कंत्राटी पद्धतीने काम करीत होता. तर, आरती ही एका बँकेत नोकरी करीत होती. पाच महिन्यांपूर्वी त्यांनी प्रेम विवाह केलेला होता. तेव्हापासून ते लोहगावात भाडेकरारावर राहात होते. सोमवारी सकाळी इमारतीमध्ये कुजलेल्या मृतदेहाचा वास येऊ लागला. त्यामुळे वरच्या फ्लॅटमध्ये रहात असलेल्या घर मालकाने साडेअकरा-बाराच्या दरम्यान पोलिसांना त्यांच्या घरामधून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याबाबत आणि वास येत असल्याबाबत माहिती कळवली.
त्यानुसार, विमानतळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काटावणीच्या सहाय्याने दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांचे मृतदेह आढळून आले. ही घटना साधारणपणे शनिवारी घडली असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शनिवारी संध्याकाळी कामावरून आल्याचे घरमालकाने पाहिले होते. त्यानंतर मात्र या दोघांना कोणीही बाहेर पाहिले नव्हते. याप्रकरणात अनेक आडाखे बांधले जात आहेत. पतीने पत्नीची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची अटकळ बांधली जात आहे. परंतु, याबाबत आम्ही अद्याप कोणत्याही निष्कर्षाप्रत आलेलो नाहीत. प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास करूनच याविषयी योग्य ती कार्यवाही केली जाईल असे वरिष्ठ निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी सांगितले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.