संग्रहित छायाचित्र
ऑफिसमध्ये का गेला, असे म्हणत १०-१२ जणांनी काळा खडक येथील नागरिकांच्या घरात घुसून नागरिकांना मारहाण केली. या प्रकरणी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. ११) रात्री आठ वाजताच्या सुमारास काळा खडक रोड, वाकड येथे घडली.
सिद्दिक शेख, नयूम पठाण, गंगाराम वेताळ, सोमनाथ देवकर, दोन महिला आणि इतर पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या घरी असताना आरोपी तिथे आले. 'तू सिद्दिक शेख यांच्या ऑफिसला का गेला' असे म्हणत फिर्यादी यांच्या घरावर लाथा मारल्या. नयूम पठाण याने फिर्यादी यांच्या कॉलरला पकडून घरात ढकलून दिले. घरातील टी पॉय फोडून त्यांना मारहाण केली. त्यांच्या पत्नीला बाहेर ओढून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच काळा खडक येथे राहणारे नीलेश ओव्हाळ, बाळासाहेब शिंदे यांच्या घरी जाऊन देखील आरोपींची ओव्हाळ, शिंदे यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून मारहाण केली.
या प्रकरणी बेकायदेशीरपणे जमाव जमवणे, दंगा करणे, गृह अतिक्रमण, विनयभंग करण्याच्या उद्देशाने महिलेवर हमला करणे, आगळीक करणे आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.