Pune Crime News: ‘येमेन’च्या नागरिकांना लुबाडणारी टोळी गजाआड

पुणे : आखाती देशांमधून पुण्यात उपचार घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना अरबी भाषेत बोलून त्यांचा विश्वास संपादन करीत अथवा पोलीस असल्याची बतावणी करीत लाखों रुपयांना गंडवणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

‘येमेन’च्या नागरिकांना लुबाडणारी टोळी गजाआड

उपचारासाठी परदेशातुन आलेले नागरिक ‘टार्गेट’ : पुणे ते दमण मार्गावरिल ६०० पेक्षा जास्त सीसीटीव्हीची पाहणी

पुणे : आखाती देशांमधून पुण्यात उपचार घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना अरबी भाषेत बोलून त्यांचा विश्वास संपादन करीत अथवा पोलीस असल्याची बतावणी करीत लाखों रुपयांना गंडवणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यापासून साडेदहा तासात ३५० किलोमीटरचा प्रवास करीत ६०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फूटेज तपासत आरोपींना जेरबंद केले. कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली असून पुणे ते दमन या मार्गावरील तब्बल ६०० सीसीटीव्ही फुटेज तपासात आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असून ३००० अमेरीकन डॉलर, ५०० सौदी रियाल, ५३ हजार रुपयांचे भारतीय चलन व मोटार जप्त करण्यात आली आहे. (Pune Crime News)

सिंकदर अली खान (वय ४४, रा. राजदूत हॉटेल जवळ, दक्षिण दिल्ली), करिम फिरोज खान (वय २९, रा. कस्तुरबा नगर, लाजपतनगर, दक्षिण दिल्ली), इरफान हुसेन हाशमी (वय ४४, रा. राजदूत हॉटेल जवळ, जंगपुरा, दक्षिण दिल्ली), मेहबुब अब्दुलहमदी खान (वय ५९, रा. राजदुत हॉटेल जवळ, जंगपुरा, दक्षिण दिल्ली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सालेह ओथमान एहमद (वय ५२, मुळ रा. येमेन) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भादवि कलम १७०, ४१९, ४७१, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशांमधील ‘येमेन’ येथील अनेक नागरिक पुण्यात उपचारांसाठी येत असतात. त्यातील बहुतांश नागरिक हे कोंढवा परिसरात राहात असतात. त्यांना भारतीय भाषा अवगत नसतात. अशा नागरिकांचा पेहराव देखील वेगळा असतो. त्यांना हेरून लुबाडण्यात येत होते. फिर्यादी सालेह ओथमान एहमद हे त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी पुण्यात आले होते. सालह अहमद ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी आशिर्वाद चौकात त्यांच्या पत्नीसह पायी जात होते. त्यावेळी एक चार चाकी गाडी त्यांच्या जवळ येऊन थांबली. गाडीमधील व्यक्तींनी त्यांच्याशी अरबी भाषेत संभाषण साधण्यास सुरुवात केली. ते पोलीस असल्याची बतावणी केली. (Pune Police)

त्यांच्याकडील वस्तू आणि ओळखपत्राची पडताळणी  करायची असल्याचे सांगत जवळ बोलावले. त्यावेळी एका आरोपीने पोलीस ओळखपत्र दाखवल्यासारखे केले. सालेह यांनी त्यांच्या खिशातील कागदपत्रे त्याला दाखवली. यासोबतच खिशातील पैसेदेखील आरोपींकडे दिले. त्यावेळी गाडीतील व्यक्तींनी  त्या कागदपत्रांचा व पैशाचा नाकाने वास घेत त्याची तपासणी केली जात असल्याचे भासवले. काही समजायच्या आत आरोपी तेथून पसार झाले. या आरोपींनी ५०० सौदी रियाल, ३००० अमेरीकन डॉलर, भारतीय चलनातील ५३ हजार रुपये असा मुदेमाल लंपास केला होता. याप्रमाणेच येमेन देशातील नागरिक अब्दुल फताह सालेह मोहसेन (वय ४७) यांना देखील फसवणण्यात आलेले होते. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात मागील वर्षी भादवि कलम ४२०, ४०६, ४१९, १७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यांचा तपास आणि आरोपींचा शोध सुरू असतानाच पोलीस अंमलदार सुहास मोरे, राहुल थोरात, जयदेव भोसले यांना आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. आरोपी एमएच १२, इजी ४२६६ मधून आले आणि त्यांनी लुबाडणूक केल्याचे या फुटेजमध्ये दिसत होते. या फुटेजच्या माध्यामातून आरोपींच्या गाडीचा माग काढण्यास सुरुवात करण्यात आली. खडीमशीन चौक मार्गे कात्रज- नवले ब्रीज -वारजे- डुक्कर खिंड-बाणेर- हिंजवडी येथील एनपीआर कॅंमेराची पाहणी करण्यात आली. याठिकाणी आरोपींनी गाडीचा नंबर बदलला. त्यावर डीएल ४सी, एएच ४९६० अशी नंबर प्लेट लावली. सीसीटीव्हीच्या माध्यमातुन ही गाडी तळेगाव उर्से टोलनाक्यावरून खालापुर टोल नाका- ते नवी मुंबई ते तुर्भे- ठाणे- पालधर -खणीवडे टोलनाका, चारोटी टोल नाका- डहाणु- घोलवड- गुजरात राज्याच्या हद्दीतुन केंद्र शासितप्रदेश दमण याठिकारणी गेल्याचे समोर आले. पोलिसांनी या फुटेजच्या आधारे दमन येथील देवका समुद्रकिनारी असलेल्या  हॉटेल सिल्टॉन ०९ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे तीन वाजता आरोपी पोचल्याचे निष्पन्न केले. या हॉटेलवर आरोपींनी मुक्काम केलएला होता. पोलिसांनी त्यांची ओळखपत्राव्दारे माहिती मिळवली. सालेह ओथमान एहमद यांना लुबाडल्याची घटना घडल्यापासून साडेदहा तासात ३५० किलोमीटरचा प्रवास करीत ६०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फूटेज तपासत आरोपींना जेरबंद केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest