संग्रहित छायाचित्र
देहूरोड: देहूरोड पोलीस ठाण्यापासून (Dehu Road Police Station) हाकेच्या अंतरावर असलेल्या साईनगर रस्त्यावर दोघांनी मिळून एका दुचाकीस्वार तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (८ जून) रात्री दहा वाजता घडली.
कार्तिक श्रीनिवास शिंगाडे (वय २३, रा मामुर्डी, देहूरोड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश राजू बनपट्टे (वय २५, रा. खराळवाडी, पिंपरी) , रोहित जाधव (वय २४, रा. पिंपळे सौदागर, सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कार्तिक हे त्यांच्या वडिलांची औषधे आणण्यासाठी निगडी येथे आले होते. औषधे घेऊन ते दुचाकीवरून साईनगर, मामुर्डी येथे जात होते. देहूरोड पोलीस ठाण्यासमोर असलेल्या सेन्ट्रल चौकातून साईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना रिक्षातून दोघेजण आले. त्यांनी कार्तिक यांची दुचाकी अडवली. जुन्या भांडणाच्या कारणावरून रिक्षातून आलेल्या दोघांनी कार्तिक यांना बेदम मारहाण केली. त्यांच्यासोबत आणखी दोघेजण होते. त्यातील एकाच्या हातात कोयता होता. त्या दोघांनी देखील कार्तिक यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.