शिरूरमधील जैन मंदिरावर दरोडा; सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधून रोकड, दागिने पळवले

शिरूर येथील बाजारपेठेत शनिवारी पहाटे सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली असून श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिराच्या पुजाऱ्याचे हातपाय बांधून रोकड व दागिने लंपास करण्यात आले.

शिरूरमधील जैन मंदिरावर दरोडा

महावीर जयंतीच्या आधी बाजारपेठेतील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिरात घडली घटना

शिरूर येथील बाजारपेठेत शनिवारी पहाटे सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली असून श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिराच्या पुजाऱ्याचे हातपाय बांधून रोकड व दागिने लंपास करण्यात आले. सुरक्षारक्षकाला लोखंडी रॉडने मारहाण केली असून चोरट्यांनी दानपेटीमधील रोकड, पद्मावती देवीचे दागिने चोरून नेले. भगवान महावीर जयंतीच्या एक दिवस आधी चोरीचा हा धाडसी प्रकार घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेत पोपट सोनबा घनवट (वय ७२, रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) हे सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शिरूरच्या कापड बाजारात मुख्य रस्त्यालगतच श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर आहे. या मंदिरात घनवट यांची सुरक्षारक्षक म्हणून नेमणूक केलेली होती. घनवट हे रात्रपाळी ड्यूटीवर होते. ते शनिवारी पहाटे मंदिराच्या मागील बाजूस पहारा देण्याकरिता फिरत होते. त्यावेळी तीन अज्ञात चोरटे मंदिराच्या मागील बाजूने आले. त्यावेळी घनवट यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना पकडून ठेवत मंदिराच्या चाव्या चोरट्यांनी मागितल्या. त्यांच्याकडे चाव्या नसल्याने लोखंडी रॉडने मारहाण केली. एका चोरट्याने त्यांना खाली पाडून धरून ठेवले.  अन्य दोन चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर कोयंडा उचकटून दानपेटी फोडली. या दानपेटीमधील रोकड बॅगेत भरली. त्यानंतर गाभाऱ्याचा दरवाजा तोडून पद्मावती देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी काढले.

हा माल ताब्यात घेतल्यावर मंदिराच्या मागील बाजूच्या दरवाजामधून चोरटे पसार झाले. थोड्या वेळाने घनवट यांनी दोरीने बांधलेले हातपाय कसेबसे सोडवले. त्यांनी घडलेला सर्व प्रकार मंदिराचे पुजारी रमेश पुजारी यांना कळवला. पुजारी यांनी मंदिराच्या विश्वस्तांना दरोड्याची माहिती कळवली. दरम्यान, पोलिसांनाही माहिती कळवण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करीत आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपासाला सुरुवात केली. दरम्यान, सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, सहायक निरीक्षक संदीप यादव यांनी घटनास्थळाला भेट दिली. आमदार ॲड. अशोक पवार, जैन श्रावक संघाचे संघपती भरत चोरडिया यांनीही मंदिराला भेट देत कारवाईची मागणी केली. मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष सतीष धाडिवाल, सचिव रमाकांत बोरा, सुभाष शहा, प्रकाश शहा, रमेश कर्नावट, विजय चोपडा, अभय बरमेचा यांनी घटनेचा निषेध केला. तसेच, देवस्थानेही सुरक्षित राहिली नसल्याबाबत खंत व्यक्त केली. शहरातील जैन समाजाच्या नागरिकांनी मंदिर परिसरात जमा होत चोरट्यांचा माग काढून त्यांना अटक करण्याची मागणी करीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

दरम्यान, चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. त्यावरून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. चोरीची पद्धत, चोरट्यांचे वर्णन यांचा अभ्यास सुरू असून त्यावरून आरोपींचा माग काढला जाईल. काही संशयितांकडे चौकशी सुरू आहे. तपासासाठी पोलिसांची पथके रवाना केल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी सांगितले.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest