आर्यन पब्लिक स्कूलच्या संस्थाचालक, मुख्याध्यापिकेवर गुन्हा
पुणे : शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींची तसेच कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता शाळा सुरू ठेवत विद्यार्थ्यांना अनधिकृतरीत्या प्रवेश देऊन पालकांकडून भरमसाठ शुल्क वसूल करून शासन, पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी नऱ्हे येथील प्रसिद्ध आर्यन पब्लिक स्कूल (Aryan Public School) या शाळेच्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापिकेविरोधात सिंहगड रोड पोलीस (Sinhagad Road Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १६ जून २०२२ ते ११ ऑक्टोबर २०२३ या कालावधी दरम्यान नऱ्हे येथील आर्यन पब्लिक स्कूलमध्ये घडला.
आर्यन सूर्यवंशी उर्फ संतोष चौरे आणि माधुरी सूर्यवंशी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अशोक श्रीरंग गोडसे (वय ५०, रा. मगरपट्टा, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. आर्यन सूर्यवंशी हे संस्थाचालक असून माधुरी सूर्यवंशी या मुख्याध्यापिका आहेत. या दोघांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटी यांची आणि कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता केली नाही. बेकायदेशीररित्या शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांची अनधिकृतरीत्या भरती प्रक्रिया राबवली. त्यांची पटावर नोंदणी करून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून अनधिकृतरीत्या भरमसाठ शुल्क वसूल केले. शाळा अनधिकृत असताना देखील अधिकृत असल्याचे भासवत विद्यार्थ्यांचे दाखले आणि अन्य कागदपत्रे ताब्यात घेतली. अन्य शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांची मागणी करून शासनाचा महसूल बुडविण्यात आल्याचे देखील या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याद्वारे शासन, पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यादव करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.