संग्रहित छायाचित्र
नफेखोरीसाठी व्यापारी कोणत्या थराला जातील याचा काही नेम नसतो. एका व्यापाऱ्याने असाच नफा कमावण्यासाठी थेट न्यायालयाचीच फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. न्यायालयीन कामकाजाकरिता वापरल्या जाणाऱ्या प्रिंटरसाठी बड्या कंपनीच्या नावाने बनावट ‘टोनर’ची विक्री करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संगणकीय साहित्य विक्री करणाऱ्या व्यावयायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी व्यंकटेश्वरा इन्फोटेक मंगलम ब्रेझा या कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तम थोरात (वय ४६) यांनी फिर्याद दिली आहे. थोरात शिवाजीनगर न्यायालयात प्रशासकीय कर्मचारी आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर न्यायालयात मोठ्या प्रमाणावर कागदांच्या प्रिंट काढाव्या लागतात. या प्रिंटरसाठी लागणारे टोनर व्यंकटेश्वरा इन्फोटेक मंगलम ब्रेझा या कंपनीमार्फत पुरवले जातात. या कंपनीकडे ३० टोनरची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. कंपनीकडून हे टोनर न्यायालयातील नाझर कार्यालयात देण्यात आले.
हे टोनर एका नामवंत कंपनीचे असल्याचे भासवण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात टोनर खराब असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर, हे टोनर कंपनीला परत करण्यात आले. त्यानंतर, कंपनीने पुन्हा न्यायालयीन प्रशासनाला नव्याने ३० टोनर पाठवले. मात्र, हे टोनर देखील खराब असल्याचे समोर आले. न्यायालयीन प्रशासकीय कर्मचारी तथा फिर्यादी थोरात यांनी टोनर निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधत याबाबत तक्रार केली. तेव्हा हे टोनर बनावट असल्याचे स्पष्ट झाले. थोरात यांनी न्यायालयीन प्रशासनाकडे टोनर पुरवठा करणाऱ्या कंपनीविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे करीत आहेत.