'ईझी मनी'साठी सायकल चोरीचा जडला नाद, सुशिक्षित दाम्पत्याला अटक
कोरोना काळात नोकरी गेल्यानंतर झटपट पैसा कमावण्यासाठी एका दाम्पत्याने शक्कल लढवित महागड्या सायकल चोरण्याचा सपाटाच लावला. या दाम्पत्याला सिंहगड रोड पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून ३ लाख ५० हजारांच्या १४ महागड्या सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
विजय राजेंद्र पाठक (वय ३६, रा. क्लोअर कासाब्लांका, तळेगाव, मूळ रा. राक्रिश अपार्टमेट, डिबॉन रोड अंबरनाथ, पूर्व) आणि डायना डेंझिल डिसोजा (वय २५) अशी आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील आनंदनगर येथून ६ ऑगस्ट रोजी सायकल चोरीला गेलेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तपास पथकाकडून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला होता. दरम्यान, २६ ऑक्टोबर रोजी तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, तपास पथकातील कर्मचारी गस्त घालत वडगाव पुलाजवळ आले होते. त्यावेली पोलीस अंमलदार सागर शेडगे व राहुल ओलेकर यांना एका काळ्या दुचाकीवरुन एक माणूस आणि पाठीमागे बसलेली महीला सायकल घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांना थांबवुन गाडी नावे विचारेली असता त्यांनी विजय पाठक आणि डायना डेंझिल डिसोजा अशी नावे सांगितली.
संशय बळावल्याने पोलिसांनी सायकलबाबत चौकशी केली. त्यांनी समाधानकारक उत्तर न देता उडवा-उडवीचे उत्तरे दिली, या दोघांनी मौजमजा करण्यासाठी महागड्या सायकली चोरी करण्याचा धंदा सुरू केल्याचे चौकशीमध्ये आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. हे दाम्पत्य सुशिक्षीत असून मौजमजा करण्यासाठी नामांकित कंपनीच्या महागड्या सायकली चोरी करण्यास २०२० सालापासून सुरुवात केली. कोविड काळात त्यांची नोकरी गेली. त्यानंतर पैशांची गरज आणि मौजमजा करण्यासाठी महागड्या सायकल चोरून त्या विकण्याचा सपाटा त्यांनी लावला. त्यांच्याकडून ३ लाख ५० हजारांच्या १४ सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत तीन गुन्ह्यांची उकल झाली असून उर्वरीत सायकलीबाबत तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन यांनी सांगितले. ही कारवाई परीमंडल तीनचे उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.