‘सारसबाग’ कुठे आहे विचारत मोबाईल, पाकीट हिसकावले; दगडांनी डोक्यावर केला आघात

पुणे : मागील काही दिवसांत रस्त्यावर लुटमार करण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. कधी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तर कधी मुलींना छेडतो काय अशी विचारणा करीत, कधी गाडीला धक्का किंवा कट का मारला असे म्हणत मारहाण करून मोबाईल आणि पाकिटे चोरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

संग्रहित छायाचित्र

पुणे : मागील काही दिवसांत रस्त्यावर लुटमार करण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. कधी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तर कधी मुलींना छेडतो काय अशी विचारणा करीत, कधी गाडीला धक्का किंवा कट का मारला असे म्हणत मारहाण करून मोबाईल आणि पाकिटे चोरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अशीच एक घटना नेहरू स्टेडियम ते अण्णा भाऊ साठे पुतळा या दरम्यान रविवारी दुपारी घडली. रस्त्याने मोबाईल पहात निघालेल्या तरुणाला अडवित सारसबागेचा पत्ता विचारण्याचा बहाण्याने थांबवून त्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याने विरोध करताच बहिणीला छेडतो का असे म्हणत मारहाण करून पाकीट पळवून नेण्यात आले.  (Pune Crime News)

याप्रकरणी उदय सुनील जाधव (वय २१, रा. सदाआनंद नगर, सोमवार पेठ) आणि विशाल हुसेनआप्पा शिरे (वय २३, रा. म. फुले वाड्याजवळ, गंज पेठ) यांच्यावर भादवि ३९४, ३९७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ओम चंद्रकांत भोसले (वय १९, रा. नरहरी कृपा अपार्टमेंट, विजयानगर कॉलनी, सदाशिव पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. ओम भोसले हे रविवारी दुपारी कामावरून घराकडे चालत जात होते. ते मोबाईलमध्ये रील्स बघत बघत जात होते. त्यावेळी आरोपी एमएच १२, आरएच ३०२३ या मोटारसायकलवरुन आले. त्यांनी फिर्यादीच्या जवळ गाडी थांबवली. त्यांना ‘सारसबाग कुठे आहे?’ अशी विचारणा केली. त्यांचे लक्ष विचलीत करून अचानक गाडीवर पाठीमागे बसलेल्या आरोपी जाधव याने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने हा मोबाईल घट्ट पकडून ठेवल्याने आरोपींना तो हिसकावता आला नाही.

तेथून पळ काढलेल्या आरोपींनी थोडे पुढे जाऊन मोटार सायकल बाजूला लावली. फिर्यादीकडे येऊन आरोपी शिरे याने ‘तु माझ्या बहिणीचे छेड का काढली?’ अशी विचारणा करीत त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. दरम्यान, आरोपी जाधव याने रस्त्यावर पडलेला दगड उचलला. फिर्यादीच्या डोक्यात हा दगड मारून त्यांना जखमी केले. त्यांच्या खिशामधून जबरदस्तीने पाकिटे काढून घेत तेथून पळ काढला. फिर्यादी यांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. आरोपींचा गाडी क्रमांक दिला. पोलिसांनी त्यावरून आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest