Pune Crime News : कपाळावर बंदूक ठेवत ओढला चाप; मध्यरात्री खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाचा खून

अज्ञात कारणावरून 35 वर्षीय तरुणाचा डोक्यामध्ये गोळी (Pune Crime News) घालून खून करण्यात आल्याची घटना पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोरपडी पेठेमध्ये (Khadak police station) घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Mon, 30 Oct 2023
  • 11:56 am
Pune Crime News : कपाळावर बंदूक ठेवत ओढला चाप; मध्यरात्री खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाचा खून

कपाळावर बंदूक ठेवत ओढला चाप; मध्यरात्री खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाचा खून

पुणे : अज्ञात कारणावरून 35 वर्षीय तरुणाचा डोक्यामध्ये गोळी (Pune Crime News) घालून खून करण्यात आल्याची घटना पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोरपडी पेठेमध्ये (Khadak police station) घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गोळी (Pune News) झाडल्यानंतर हल्लेखोर साथीदाराच्या दुचाकीवर बसून पसार झाला. याप्रकरणी पहाटे सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

अनिल रामदेव साहू (Anil Ramdev Sahu) (वय ३५, रा. २०१ श्रीकृष्ण हाईट्स, दुसरा मजला, मूळ रा. वाझिदपूर, दरभंगा, बिहार) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ धरणकुमार हरिदेव साहू (वय २४) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, फिर्यादी धरण कुमार आणि अनिल साहू हे जेवण वगैरे झाल्यानंतर घरामध्ये बसलेले होते. साधारणपणे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दरवाजावर चार-पाच वेळा जोरजोराने थापा मारल्याचा आवाज आला. धरणकुमार यांनी हा दरवाजा उघडला. त्यावेळी त्याला एक जण दरवाजात उभा असल्याचे दिसले. त्याने 'तेरा भाई किधर है' अशी विचारणा केली. धरणकुमार याने 'वो अंदर बैठा है' असे सांगितले.

आरोपीने त्याला भावाला बोलवण्यास सांगितले. धरण कुमार हा आत गेला आणि किचनमध्ये बसलेल्या त्याच्या चुलत भावाला कोणीतरी भेटायला आल्याचे सांगितले. त्यानुसार, अनिल हा बाहेर कोण आलंय हे पाहण्यासाठी दरवाजाजवळ गेला. त्यावेळी धरणकुमार हा पाणी पीत होता. अनिल दरवाज्यात उभा राहून समोरच्या व्यक्तीशी बोलत होता. समोरच्या व्यक्तीने त्याला काहीतरी विचारले. त्यावेळी अनिल याने त्याला मान हलवीत नकार दिला. त्यावेळी चिडलेल्या आरोपीने बंदूक काढून त्याच्या कपाळावर लावली आणि गोळी झाडली. काही कळायच्या आतच रक्ताच्या थारोळ्यात अनिल जमिनीवर कोसळला. गोळी झाडणारा आरोपी तेथून धावत खाली गेला आणि त्याच्या साथीदाराच्या दुचाकी वर बसून तिथून पसार झाला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसानी पंचनामा करीत मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान, या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप समजले नसून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसानी आरोपीचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपत राऊत करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest