चोरट्यांच्या त्रिकुटावर मोक्का, पोलीस आयुक्तांची ७५ वी कारवाई
पुणे : चंदन नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोबाईल हिसकावल्याच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेल्या तीन जणांच्या टोळीवर पुणे शहर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अनुसार कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत करण्यात आलेली ही ७५ वी मक्का कारवाई आहे.
राहुल मुकेश सिंग (वय १९, रा. सणसवाडी, मुळ रा. पाटणा, बिहार), प्रसाद संतोष भोंडवे (वय १८,रा. खराडी रोड, चंदननगर) आणि राज राहुल नगराळे (वय १९, रा. गलांडे नगर, मुंढवा रोड, मुळ रा. यवतमाळ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील राहुल सिंग हा टोळी प्रमुख आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह संघटित गुन्हेगारीची टोळी तयार केली. या टोळीने जबरी चोरी करणे, घटक हत्यारे किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत करणे, चोरी करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे.
या टोळीने हे सर्व गुन्हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि टोळीचे वर्चस्व दहशत कायम ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या टोळीवर मोक्का लावण्या संदर्भात चंदन नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी पोलीस उपयुक्त शशिकांत बोराटे यांच्यामार्फत अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला शर्मा यांनी मान्यता दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक आयुक्त संजय पाटील करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.