जलवाहिनीसाठी रस्ता खोदला, तसाच ठेवला; नागरिकांचा जीव गेल्यावर महापालिकेला जाग येणार का?

शहरातील नागरिकांना समान पाणीवाटपासाठी महापालिका ‘२४ बाय ७’ योजना राबवत आहे. यासाठी खराडी भागातील राघोबा पाटील नगर येथील जुना मुंढवा रस्ता खोदून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र सहा महिने उलटून गेल्यानंतरही संबंधित पालिकेकडून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Wed, 6 Sep 2023
  • 11:48 am
PMC news

जलवाहिनीसाठी रस्ता खोदला, तसाच ठेवला

असा सवाल करीत पंचशील चॅरिटेबल ट्रस्टकडून धरणे आंदोलन

शहरातील नागरिकांना समान पाणीवाटपासाठी महापालिका ‘२४ बाय ७’ योजना राबवत आहे. यासाठी खराडी भागातील राघोबा पाटील नगर येथील जुना मुंढवा रस्ता खोदून पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. मात्र सहा महिने उलटून गेल्यानंतरही संबंधित पालिकेकडून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी या रस्त्यावरून वाहतूक कोंडी होत असून अपघात वाढले आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करावी आणि नागरिकांचा जीव वाचवावा या मागणीसाठी पंचशील चॅरिटेबल ट्रस्टने महापालिकेच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे.

राघोबा पाटील नगरमधून जुना मुंढवा रस्ता खराडी बायपासला जोडला आहे. हडपसरकडे तसेच वाघोलीकडे जाण्यासाठी नागरिकांना हा रस्ता सोयीचा आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने वाहतूक कोंडी सातत्याने होत असते. गेल्या सहा महिन्यांपूर्वी पाण्याच्या पाईपलाईनचे काम करण्यासाठी हा रस्ता खोदण्यात आला. पाईपलाईन टाकण्यात आली. त्यानंतर त्यावर डांबरीकरण केले जाईल, अशी नागरिकांची आपेक्षा होती. मात्र दुरुस्तीचे कोणतेही काम होत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या सहा महिन्यात सुमारे दहा ते बारा अपघात या रस्त्यावर झाले आहेत. दोन अपघातात एका महिलेचा आणि लहान मुलाचा हात मोडला. दररोज सातत्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत. आता अपघातात एखाद्याचा जीव गेल्यावर महापालिकेला जाग येणार आहे का, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना उपस्थित केला.

रस्त्याचे काम पूर्ण करावे अन्यथा महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन व उपोषण करू असे पालिकेला पंचशील चॅरिटेबल ट्रस्ट, भोलेनाथ मित्र मंडळ, खराडी व्यापारी संघटना, समर्थ मित्र मंडळ साईनाथनगर आणि खराडीतील राघोबा पाटील नगर येथील रहिवाशांनी सांगितले होते. मात्र त्याला दोन महिने झाले तरी कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे धरणे आंदोलन करण्यात आल्याचे महेंद्र साळवी, संदीप वाघमारे, दीपक गायकवाड, संजोक लोंढे, मोतिराम तायडे, किसन भालेराव यांनी सांगितले.  

दोन्ही घरचा पाहुणा उपाशी...

जुना मुंढवा रस्ता हा खराडी आणि वडगाव शेरी या दोन गावांना जोडणारा आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय प्रतिनिधीकडून या रस्त्याबाबत ठोस भूमिका घेतली जात नाही. जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न आहे. त्यामुळे खराडी आणि वडगाव शेरी या भागातील नागरिकांना याचा चांगलाच त्रास होत असून त्यांची "दोन्ही घरचा पाहुणा उपाशी " अशी गत झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले.

पाण्याच्या पाईपलाईनचे काम करण्यासाठी रस्ता खोदण्याला आम्ही विरोध केला नव्हता. काम झाले, रस्ता बुजवण्यात आला, मात्र डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उंचवटे तयार झाले आहेत. यामुळे दुचाकींचा घसरून अपघात होत आहे. काम पूर्ण होताच रस्त्याचे काम करून दिले जाईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र आता तक्रार केली असता, 'तुम्ही सरकारी कामामध्ये अडथळा आणू नये अन्यथा तुमच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल' असा दम पालिकेचे अधिकारी देत आहेत.

- पंकज साबळे, अध्यक्ष पंचशील चॅरिटेबल ट्रस्ट साईनाथनगर

ज्या रस्त्यावरून पाण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. तो खासगी मालकीचा आहे. रस्ता खोदून पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम करू दिले. मात्र दुरुस्तीचे काम अडविले आहे. महापालिकेने रस्त्यासाठी गेलेल्या जागेचा मोबदला अद्याप दिला नाही. मोबदला मिळावा यासाठी टीडीआरसाठी फाईल दाखल केली आहे. असे मूळ मालकाचे म्हणणे आहे. मालकाचा विरोध होत असल्याने दुरुस्तीचे काम रखडले आहे.

 - अनिरुध्द पावकर, मुख्य अभियंता, पाणी पुरवठा विभाग  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest