संग्रहित छायाचित्र
दिवाळी सणानिमित्ताने फटाके स्टॉल उभारण्यासाठी मोकळ्या जागेत, मोकळी मैदाने, शाळेतील मैदाने तसेच वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी रस्त्याच्या बाजूला महापालिकेकडून परवानगीही दिली जाते. त्यापोटी महापालिकेला उत्पन्नदेखील मिळते. यंदा मात्र फटाके स्टॉलच्या लिलावाबाबत उदासीन भूमिका घेतल्याचे दिसून आले. याचाच फायदा घेत शहरात विविध ठिकाणी बेकायदा फटाके स्टॉलची संख्या वाढली असल्याने वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
हडपसर, सहकारनगर, सिंहगड रस्ता, वारजे, येरवडा, खराडी, मांजरी, विमाननगर, धानोरी, विश्रांतवाडी, वडगाव शेरी, धानोरी, धायरी, सिंहगड रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, बिबवेवाडी, कोथरूड या परिसरात असे स्टॉल सुरू झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही समोर आला आहे. यातील बहुतांश स्टॉल हे पदपथावरच उभारण्यात आल्याचे दिसून येत आहे. याबाबत पुणेकरांकडून महापालिकेकडे तक्रार केली जात आहे. त्याची दखल घेत ही अतिक्रमणे तातडीने दूर करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले आहेत.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा कोणताही विचार न करता अनेक भागात दिवाळीसाठी बेकायदा पद्धतीने फटाक्यांचे स्टॉल उभारून विक्री केली जात आहे. दिवाळीच्या काळात फटाका विक्री करण्यासाठी महापालिकेच्या वतीने लिलाव करून स्टॉल उपलब्ध करून दिले जातात. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये असलेल्या जागांचा लिलाव करून हे स्टॉल दिले जातात. यंदा शनिवार पेठेतील उद्यान वगळून अन्य कोणत्याही ठिकाणी फटाक्यांच्या स्टॉलला महापालिकेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, दुसरीकडे शहराच्या सर्वच भागातील रस्त्यांवर सर्रास पत्र्याचे शेड उभारून फटाके विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. पालिकेची कोणतीही परवनागी न घेता हे स्टॉल उभारण्यात आले आहेत. रस्त्यांवर तसेच फूटपाथवर हे बेकायदा स्टॉल उभारताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन केले आहे की नाही, याची माहितीदेखील महापालिकेकडे उपलब्ध नाही.
बेकायदा फटाके स्टॉल उभारण्यात आल्याचा फायदा घेत स्थानिक दादा, भाऊ, आण्णा तसेच स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यांकडून
कारवाईची भीती दाखवून हप्ता वसुली केली जात असल्याचे दिसून येत आहे. तक्रार अर्ज करून वसुली केली जात असल्याचा आरोप केली काही बेकायदा स्टॉल विक्रेत्यांनी सांगितले. शहरात बेकायदा फटाका स्टॉलच्या तक्रारींची दखल घेत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी नागरिकांच्या सुरक्षेस प्राधान्य देऊन कारवाई करण्याचे आदेश अतिक्रमण विभाग तसेच आकाश चिन्ह विभागाला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईची नोटीस पाठवली जात आहे.
रस्त्यावर, पदपथावर बेकायदा पद्धतीने फटाके विक्रीची दुकाने उभारण्यात आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. असे करणे चुकीचे आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यावर कारवाई करण्याच्या सूचना अतिक्रमण विभागाला दिल्या आहेत. स्थानिक राजकीय नेत्यांना हाताशी धरून ही फटाक्यांची दुकाने सुरू केली जातात, तर काही ठिकाणी अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने दुकाने थाटण्यात आली आहेत, असाही आरोप केला जात आहे.
- पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका