संग्रहित छायाचित्र
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका हा अनेक गुन्हेगारी कृत्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. खून करून एखाद्याला मारून टाकणे हे तर नित्याचेच आहे. परंतु आठ वर्षे पाळलेल्या एका कुत्र्याला मालकाने फाशी देऊन मारून टाकल्याची घटना नुकतीच पिरंगुट परिसरात घडली आहे.
या प्रकरणी पौड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पिरंगुटच्या निकटेवस्ती परिसरामध्ये वास्तव्यास असलेल्या ओमकार जगताप कुटुंबीयांकडे हा लॅब्राडोर जातीचा श्वान गेल्या ७ ते ८ वर्षांपासून होता. काल श्वानाच्या मालकाने मिशन पॉसिबल फाउंडेशन या संस्थेच्या पद्मिनी पिटर स्टंप यांना संपर्क केला. त्यावेळी सांगितले की, आम्हाला हा श्वान सांभाळायचा नाही, तुम्ही त्याला घेऊन जा. श्वानाला घेण्यासाठी रुग्णवाहिका पाठवत असल्याचं पद्मिनी यांनी सांगितलं. काही वेळाने पुन्हा मालकाने पद्मिनींना कॉल केला. तुम्ही येऊ नका मी माझ्या श्वानाला मारून टाकल्याचं सांगितलं. त्याचे फोटोसुद्धा त्यांनी पद्मिनींना पाठवले. विकृत बुद्धीच्या या मालकाच्या कृतीनं पद्मिनी संतापल्या. त्यांनी या संदर्भात पौड पोलिसात श्वान मालक आणि एका महिलेच्या विरोधात पाळीव प्राण्याची क्रूरतेने हत्या केल्याबद्दल तक्रार दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पौड पोलिसांनी श्वानमालक ओमकार जगताप आणि एका महिलेच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता, प्राणी क्रूरता अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. श्वानाला कोणताही आजार नव्हता, तरी मालकाने असं कृत्य का केलं याबाबतचा तपास पौड पोलीस करत आहे. दरम्यान हा सर्व प्रकार गंभीर असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आणि प्राणिप्रेमी आदित्य ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केली होती.
करत या घटनेतील आरोपींवर पुणे ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणीदेखील केली आहे.