संग्रहित छायाचित्र
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये माध्यम कक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून निवडणूक प्रक्रियेदरम्यान माध्यम कक्ष समन्वय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निरपेक्षपणे व पारदर्शकपणे कामकाज करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षाला डॉ. पुलकुंडवार यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे, निवडणूक उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्ष समन्वयक डॉ. रवींद्र ठाकूर, निवडणूक शाखेच्या तहसीलदार शीतल मुळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे साहाय्यक प्राध्यापक योगेश बोराटे, साहाय्यक संचालक जयंत कर्पे यावेळी उपस्थित होते.
विविध माध्यमांमधील जाहिराती आणि पेड न्यूजबाबत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती डॉ. पुलकुंडवार यांनी घेतली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाविषयी माहिती दिली.
जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्ष समन्वय अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, साहाय्यक संचालक जयंत कर्पे यांनी माध्यम कक्षातर्फे तयार करण्यात येणाऱ्या विविध अहवालांची माहिती दिली.
माध्यम कक्षात सुमारे १० दूरचित्रवाणी संचांच्या माध्यमातून वृत्तवाहिन्यांतील निवडणूक प्रचार, जाहिरात, पेड न्यूज आदींच्या अनुषंगाने संनियंत्रण केले जात आहे. तसेच सोशल मीडियावरील पोस्टबाबतही बारकाईने संनियंत्रण केले जात आहे. वृत्तपत्रातील जाहिराती आणि पेड न्यूजबाबतही दररोजच्या वृत्तपत्रांचे अवलोकन केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सी-व्हीजील आणि निवडणूक खर्च कक्षालाही विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी भेट दिली.
गैरहजर राहिल्यास होणार कारवाई - डॉ. सुहास दिवसे
निवडणूक कामकाजांतर्गत प्रथम प्रशिक्षणास विनापरवानगी गैरहजर राहून हलगर्जीपणा केल्याबद्दल लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील कलम ३२ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याने संबंधित गैरहजर अधिकारी कर्मचाऱ्यांनी तत्काळ निवडणूक कर्तव्यावर हजर व्हावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कामकाजाकरीता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ नुसार संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांना आवश्यक विविध आस्थापनांच्या मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित मतदारसंघातील शाळा, महाविद्यालये, शासकीय, निम-शासकीय कार्यालये, विविध आस्थापना, केंद्र शासन व सहकारी संस्था, बँका व खासगी आस्थापनांकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सर्व २१ विधासभा मतदारसंघात निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण त्या त्या मतदारसंघात २६ व २७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, त्यामुळे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबत नोंद घेऊन तत्काळ निवडणूक कर्तव्यावर हजर व्हावे, असेही डॉ. दिवसे यांनी स्पष्ट केले आहे.