चांदणी चौकातील भुलभुलैय्या दुर करण्यासाठी महापालिकेने घेतला पुढाकार

मोठ्या थाटामाटात एनडीए चौकाचे लोकार्पण केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १२ ऑगस्ट रोजी करण्यात आले. यानंतर या चौकातील वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर होणार असे चित्र निर्माण झाले होते. त्याला काही प्रमाणात यश आले असेल तरी एनडीए तथा चांदणी चौकाची स्थिती म्हणजे भुलभुलय्या झाली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Wed, 30 Aug 2023
  • 10:47 am
Chandni Chowk : चांदणी चौकातील भुलभुलैय्या दुर करण्यासाठी महापालिकेने घेतला पुढाकार

संग्रहित छायाचित्र

सर्वेक्षण केले सुरू प्रवाशांची गोंधळाची स्थिती टाळण्यासाठी पाच प्रमुख रस्त्यांकडे कसे जायचे याचे नकाशे (मॅप) करणार तयार

अमोल अवचिते 

मोठ्या थाटामाटात एनडीए चौकाचे लोकार्पण केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १२ ऑगस्ट रोजी करण्यात आले. यानंतर या चौकातील वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर होणार असे चित्र निर्माण झाले होते. त्याला काही प्रमाणात यश आले असेल तरी एनडीए तथा चांदणी चौकाची स्थिती म्हणजे भुलभुलय्या झाली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने पुढाकार घेतला असून पाच प्रमुख रस्त्यांकडे कसे जायचे याचे नकाशे (मॅप) तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसेच या चौकात पादचाऱ्यांसाठी अधिक सुविधाही निर्माण केल्या जाणार आहेत.

चांदणी चौकात इतर भागातून उतरलेल्या प्रवासी नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. त्यासाठी विविध आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत.  पादचाऱ्यांना या चौकातून सोयीचे व्हावे, यासाठी प्राधान्याने उपाय योजना केल्या जाणार आहेत.  यामुळे नागरिकांना विशेषतः पादचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी कमी होतील. अशी माहिती महापालिकेचे वाहतूक नियोजन अधिकारी निखिल मिजार यांनी दिली.

चांदणी चौकात महापालिकेतर्फे पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी दूर होतील. त्यासाठी आवश्यक वाहतूक चिन्हे व अन्य उपाययोजना केल्या जाणार आहेत. या चौकातील प्रकल्पाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे. प्राधिकरणातर्फे पादचारी पूलही उभारण्यात येणार असल्याचे महापालिकेचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले.

रहिवासी सी.एस. कृष्णन म्हणाले की, "नागरिकांचा त्रास दूर करण्यासाठी भुयारी मार्ग, पादचाऱ्यांसाठी पदपथ बांधणे गरजेचे आहे."

 पादचारी संघटनेच्या सदस्या प्रांजली देशपांडे म्हणाल्या की "असोसिएशनची सदस्य या नात्याने मी यापूर्वीही पदपथ आणि क्रॉसिंगसाठी सूचना केल्या होत्या, परंतु महापालिका रस्त्याचे काम राज्य सरकार करणार असल्याचे सांगत राहिली आणि आमची सूचना नाकारली. पदपथ बांधण्यासाठी आता खरच खूप उशीर झाला आहे. मात्र आता महापालिकेच्या पुढाकाराने गोंधळ दूर होण्यास किती मदत होते ते पाहावे लागणार आहे."

महापालिका लावणार नकाशे...

  महापालिकेकडून चांदणी चौकात ठिकठिकाणी कोथरूड, मुळशी, बावधन, सातारा व मुंबईकडे कसे जायचे याचे नकाशे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच हे नकाशे तिथे लावण्यात येणार आहेत.

चांदणी चौकाची आताची परिस्थिती...

- वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चांदणी चौकात सुमारे ३९७ कोटी रुपये खर्च

- रॅम्प व १७ किलोमीटर लांबीचे सेवा रस्त्याचे उभे केले जाळे

- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी दिशादर्शक फलक लावले नसल्याने वाहनचालक संभ्रमात

- कोणता रस्ता, कुठे जातो हेच समजत नसल्याने नागरिकांची होत आहे गैरसोय

- एक रस्ता जरी चुकला तरी वाहनचालकांना किमान दोन ते तीन किलोमीटरचा पडतो फेरा

- वाहनचालकांत प्रचंड पसरली आहे नाराजी

- वारज्याहून मुळशी व बावधनला जाणाऱ्या रस्त्यांवर तसेच कोथरूडहून मुंबईला जाणाऱ्या रस्त्यांवर फलक नसल्याचा वाहनचालकांना बसतो मोठा फटका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest