PMC News : महापालिकेकडून सर्व आजारांवरील उपचारासाठी तज्ञ डॉक्टर

कान, नाक, घसा, डोळे, त्वचा तसेच इतर वेगेवेगळ्या आजारांवरील स्पेशल उपचारासाठी खासगी दवाखान्यात चांगलेच पैसे मोजावे लागतात. या उपचारांवर उपचारासाठी रुग्णांना आता पैसे मोजण्याची वेळ येणार नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Tue, 7 Nov 2023
  • 09:46 pm
PMC News : महापालिकेकडून सर्व आजारांवरील उपचारासाठी तज्ञ डॉक्टर

महापालिकेकडून सर्व आजारांवरील उपचारासाठी तज्ञ डॉक्टर

शहरातील दहा ठिकाणी प्रत्येक दिवसाला घेता येणार उपचार

पुणे: कान, नाक, घसा, डोळे, त्वचा तसेच इतर वेगेवेगळ्या आजारांवरील स्पेशल उपचारासाठी खासगी दवाखान्यात चांगलेच पैसे मोजावे लागतात. या उपचारांवर उपचारासाठी रुग्णांना आता पैसे मोजण्याची वेळ येणार नाही. कारण महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून अशा आजारांवर मोफत उपचारासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम नेमली जाणार आहे. शहरातील दहा ठिकाणी पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून ओपीडी सुरु केली जाणार आहे.

शहरातील दहा ठिकाणी पॉलिक्लिनिकमध्ये सर्व आजारांवर तज्ञ डॉक्टर उपचार करणार आहेत. महापालिका यासाठी डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे. महापालिका आरोग्य सुविधांसाठी वेगवेगळ्या पातळयांवर प्रयत्न करत आहे. यामध्ये आपला दवाखाना, आरोग्य वर्धीनी केंद्र अशा सुविधा आहेत. मात्र पॉलिक्लिनिकमध्ये सर्जन डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत. महापालिका प्रशासनाने यासाठी ५ हजार रुपये प्रत्येकी भेटीला असे दर निश्‍चित केले आहेत. त्यामुळे महापालिकेला डॉक्टर मिळाल्यास शहरातील नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे. पॉलिक्लिनिक २ ते १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत.

स्पेशल आजारावरील तज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेण्यासाठी किमान ५०० रुपये मोजावे लागतात. तसेच औषधे बाहेरुन घ्यावी लागतात. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना उपचार घेणे आर्थिक दृष्ट्या न परवडणारे आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांनी उपचार घ्यावेत. यासाठी रुग्णांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांचा कायापालट देखील करण्यात येणार आहे.

राज्य सरकारच्या आपला दवाखाण्याला मंजुरी

राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत. नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे. तसेच नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यादृष्टीने आपला दवाखाना ही संकल्पना राबवण्यात येत आहे. यासाठी राज्यशासनाकडून शहरात ५८ दवाखाने मंजूर करण्यात आले आहेत. हे दवाखाने लवकरात लवकर सुरु करण्यासाठी महापालिका आता जागा शोधत आहे.

शहरातील नागरिकांना सर्व आजारांवर मोफत उपचार देण्यात येणार आहेत. यासाठी पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून ओपीडी सुरु केली जाणार आहे. या ओपीडमध्ये प्रत्येक आजारावरील तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. ही सेवा मोफत असणार आहे. महापालिकेने दहा ठिकाणांची निवड केली आहे. त्या जागा देखील प्राप्त झाल्या आहेत.

 - डॉ. भगवान पवार, आरोग्य प्रमुख, महापालिका.

या ठिकाणी असणार पॉलिक्लिनिक..

१) सैनिक भवन धानोरी

२) कै. ह.भ.प. तुकाराम गेनुजी वेडे पाटील, म.न.पा. इमारत बावधन खुर्द

३) म्हाळुंगे ग्रामपंचायत कार्यालय संपूर्ण इमारत, तळ मजला व पहिला मजला हडपसर

४) हिंगणे खुर्द मँर्टनिटी हॉस्पिटल बांधलेली जागा

५) स.नं. ८१ हिंगणेमळा महात्मा क्रीडा संकुल येथील पहिला मजला हॉल.

६) रोहन काळे दवाखाना, काळे बोराटे नगर, हडपसर, पुणे,

७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यु.पी.एच.सी., डायसप्लॉट, गुलटेकडी

८) शिवराय प्रसुतीगृह यु.सी.एच.सी.

९) बाणेर आरोग्य केंद्र, बाणेर

१०) साई सत्यम पार्क, वाघोली

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest