हजारे उद्यानातील फुलराणी 'कोमेजली'; समस्यांच्या विळख्यात अडकले वडगाव शेरी येथील उद्यान
सोमनाथ साळुंके
पुणे: वडगाव शेरी भागातील पालिकेचे आनंद पार्क परिसरातील स्वातंत्र्यसैनिक अण्णा हजारे उद्यान समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. उद्यानातील फुलराणी धूळखात पडून असून ती डब्यात गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या शहरात वाढत्या सिमेंटच्या जंगलामुळे सर्वसामान्य नागरिकांचा कोंडमारा झाला आहे.त्यामुळे यातून नागरिकांची सुटका व्हावी, या उद्देशाने पालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने शहरातील विविध भागात कोट्यवधी रुपये खर्च करून उद्याने उभारण्यात आली आहे. मात्र उद्यान अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे अनेक उद्याने ही शेवटची घटका मोजत आहेत. यापैकीच एक उद्यान म्हणजे वडगाव शेरी भागातील समाजसेवक पद्मभूषण डॉ. अण्णा हजारे उद्यान.
या मतदारसंघाकडे पूर्व हवेली भागाचे प्रवेशद्वार म्हणून पाहिले जाते. ३० वर्षांपूर्वीच्या येरवडा येथील इंद्रप्रस्थ उद्यानानंतर आनंद पार्क परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी एक उद्यान उभारून त्याचे नामकरण समाजसेवक पद्मभूषण डॉ. अण्णा हजारे असे करण्यात आले. यापूर्वी बालचमूंना खेळाचा चांगल्या प्रकारे आनंद लुटता यावा यासाठी फुलराणी ठेवण्यात आली. त्यामुळे येथे येणाऱ्या लहान मुलांमध्ये नेहमीच फुलराणीत बसण्यासाठी चढाओढ असायची. त्यामुळे हे उद्यान नेहमीच लहान मुलांच्या किलबिलाटाने फुलून येत होते. मात्र सद्य परिस्थितीत हे वातावरण मावळले आहे. कारण येथील फुलराणी आता उद्यान विभाग अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा बळी ठरली आहे. फुलरानीच्या टायर गंजले आहेत. ज्या फुलराणीत बसण्यासाठी चिमुकल्यांची गर्दी उसळत होती.ती आता शांतपणे एका जागेवर उभी आहे. एवढेच नव्हे तर तिच्या बैठक व्यवस्थेचीही दुरवस्था झाली आहे.
उद्यानातील फुलराणी बंद असल्याने बालकांनीही या उद्यानाकडे पाठ फिरवली आहे.याबरोबरच येथे लहान मुलांना खेळायला घेऊन येणारे आजी-आजोबा हे योगाचा सराव करत असतात. त्यांच्यासाठी उद्यानात स्वतंत्र पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. पण त्यासही गळती लागल्याने पावसाचे पाणी हे पूर्णपणे पत्र्याच्या छिद्रातून सांडत असल्यामुळे याचा विनाकारण त्रास ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे.
पालिकेच्या उद्यान विभाग अधिकाऱ्यांचे उद्यानातील देखभाल-दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच येथे येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिक हौद ठेवण्यात आले आहेत. मात्र हे हौद पाण्याविना ठणठणीत कोरडे असून ते अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याचे पाहायला मिळत आहे. उद्यान परिसरात बसवण्यात आलेले पथदिवे हे बहुतांश प्रमाणात बंद अवस्थेत आहेत. या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक जरी करण्यात आली असली तरी पण गेल्या अनेक वर्षांपासून सुरक्षा रक्षकच हजर नसल्याने त्यांच्यासाठी असणारी केबिन तुटलेल्या अवस्थेत असून धूळखात पडून आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी दोन स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. पण यातील एकाच स्वच्छतागृहाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे उद्यान आता शेवटची घटका मोजत आहे. यासंदर्भात माजी नगरसेवक सचिन भगत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. तर पालिका उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे यांनी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन पावसाने विश्रांती दिल्यावर उद्यानाचे काम हाती घेणार असल्याचे उत्तर दिले आहे. सध्या परिसरात दुसरे कोणते जवळपास उद्यान नसल्याने नागरिकांचा कोंडमारा होत असल्याने यातून लवकर मुक्तता करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पालिका प्रशासन हे सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधांबाबत उदासीन आहे. उद्यान विभाग अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे उद्यानाची अशी दुरवस्था होत असेल तर नागरिकांना या उद्यानाचा उपयोग काय?
- सतीश जाधव, स्थानिक नागरिक, वडगाव शेरी