मतदारांच्या समस्या सोडवण्यावर भर; समान प्रतिनिधित्व, सलोखा, शांती, प्रगती, एकोप्यासाठी लढा असल्याची पुणे कॅन्टोन्मेंटमधील काँग्रेस उमेदवार रमेश बागवे यांची माहिती

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रमेश बागवे यांनी मतदारसंघातील विविध समस्या आणि त्यावरील उपाय, यावर प्रचारात अधिक भर दिला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 18 Nov 2024
  • 02:06 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रमेश बागवे यांनी मतदारसंघातील विविध समस्या आणि त्यावरील उपाय, यावर प्रचारात अधिक भर दिला. गोरगरीब-कष्टकरी जनतेपासून उच्चभ्रू सोसायट्यांमधील नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांनी आपले मुद्दे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पुत्र अविनाश बागवेदेखील प्रचाराच्या आघाडीवर आहेत. या दोघांनी ‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’शी संवाद साधला. यामध्ये त्यांनी मतदारसंघाच्या विकासासाठीचे त्यांचे उद्दिष्ट, योजना आणि दूरदृष्टी मांडली. गेल्या दशकभरातील प्रशासनाच्या अपयशावर त्यांनी कडाडून टीका करत मतदारांना चांगले जीवनमान देण्यासंबंधी आश्वस्त केले.

प्रचार कसा सुरू आहे?
प्रचार खूप उत्साहपूर्ण चालू आहे. येथील जनता बदलाची अपेक्षा बाळगून आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला आहे, आणि आम्हाला खात्री आहे की २० नोव्हेंबरला येथे नक्कीच परिवर्तन होईल, असे अविनाश बागवे म्हणाले.

नागरिकांनी प्रामुख्याने कोणत्या समस्या मांडल्या आहेत?
रमेश बागवे म्हणाले, ‘‘माझ्या २००९ ते २०१४ या आमदारकीच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली. मात्र, गेल्या दहा वर्षांत पुणे कॅन्टोन्मेंटला दुर्लक्षित करण्यात आले आहे.  जरी महापलिका, राज्य आणि केंद्रात भाजप सत्तेत असले तरीदेखील वित्त मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय भाजपकडे असूनही या भागासाठी पुरेसा निधी आला नाही. यामुळे अनेक मूलभूत पायाभूत प्रकल्प रखडले आहेत.’’

मुख्य समस्या सोडवण्यासाठी नियोजन 
वाहतूक समस्या : रहिवाशांच्या सूचनांनुसार उड्डाणपूल बांधणे, रस्ते रुंदीकरण आणि संपूर्ण वाहतूक व्यवस्थापन योजना तयार करणार

आरोग्य सुविधा : ससून आणि सरदार पटेल रुग्णालयांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅन्टोन्मेंटमध्ये नवीन रुग्णालय उभारणार

पाणीपुरवठा : २४/७ योजनेमधून समान पाणीपुरवठा शक्य नसला तरी नागरिकांना रोज पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित केला जाईल.

जनता दरबार : प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या भागात जाणता दरबार आयोजित करून नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या जातील.

महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना

‘‘महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल. पोलीस, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक रहिवाशांच्या सहकार्याने हॅरासमेंट प्रकरणांवर जलद कार्यवाही करणारे पथक तयार करू. महिलांसाठी उपलब्ध पोलीस हेल्पलाइनचा प्रचार करून त्या सहज उपलब्ध केल्या जातील,’’ असे अविनाश बागवे यांनी सांगितले.

मुख्य समस्या
वाहतूक कोंडी :
कोरेगाव पार्क रस्ता, शिवरकर रस्ता आणि बी. टी. कवडे रस्ता यांसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.

पाण्याचे असमान वितरण : मोदीखाना, वानवडी आणि घोरपडी येथे अनेकदा पाणी मिळत नाही.  रहिवाशांना टँकरवर अवलंबून राहावे लागते.

अपूर्ण आरोग्य सुविधा : सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाची दयनीय अवस्था झाली आहे. गरीब रहिवाशांना उपचारांसाठी झगडावे लागते आहे. तर, ससून रुग्णालयात चांगल्या सुविधा फक्त अमली पदार्थांच्या विक्रेत्यांसाठी असल्याचा आरोप केला जातो आहे.

मालमत्ता हस्तांतरणातील विलंब

हॉकर्सचे प्रश्न



आम्ही निवडणुकीपुरता लोकांशी संवाद साधत नाही. २०१४ आणि २०१९ मध्ये पराभव झाल्यानंतरही आम्ही नागरिकांसोबत राहिलो. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. २०१६ ते २०२२ या काळात पुणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष म्हणून मी मजबूत संघटन उभे केले. महामारीच्या काळात आम्ही लोकांमध्ये जाऊन मदत केली. निवडणुकीत धर्म किंवा जातीवर आधारित मतदान करण्याचा ट्रेंड घातक आहे. या मतदारसंघातील सर्व समुदायांना विशेषत: बौद्ध, हिंदू, गुजराती, मारवाडी, मुस्लीम यांना समान प्रतिनिधित्व आणि सामाजिक सलोखा हवा आहे. शांती, प्रगती आणि एकोपा हवा आहे.
- रमेश बागवे, उमेदवार, महाविकास आघाडी, कॉंग्रेस

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest