Pune RTO : आरटीओ कारवाईचा फुसका बार

दिवाळीच्या निमित्ताने जास्त भाडे (higher Ticket) आकारल्यास खासगी बससेवा (Private bus service)पुरवणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा इशारा पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) (RTO) वारंवार दिला असला तरी प्रत्यक्षात तो फुसका बार ठरत असल्याचे दिसून येत आहे. (Pune RTO)

Pune RTO

आरटीओ कारवाईचा फुसका बार

खासगी बससेवेच्या जास्त दरासंदर्भात प्रवाशांनाच लावले कामाला, तक्रारी करूनही पुन्हा सविस्तर माहिती देण्याची केली मागणी

दिवाळीच्या निमित्ताने जास्त भाडे (higher Ticket) आकारल्यास खासगी बससेवा (Private bus service)पुरवणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा इशारा पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) (RTO) वारंवार दिला असला तरी प्रत्यक्षात तो फुसका बार ठरत असल्याचे दिसून येत आहे. (Pune RTO)

 खासगी बससेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांनी जास्त भाडं आकारलं गेलं तर त्यांच्याविरोधात व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन पुणे आरटीओने केले आहे. त्यानुसार संबंधित व्हॉट्सॲप क्रमांकावर प्रवाशांच्या २८ तक्रारी आल्या आहेत. त्या तक्रारींनुसार कारवाई करण्याऐवजी आरटीओने प्रवाशांनाच कामाला लावत केलेल्या तक्रारींची पुन्हा सविस्तर माहिती पाठण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आरटीओ कारवाईचा इशारा म्हणजे फुसका बार असल्याची टीका प्रवाशांकडून केली जात आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातून आपल्या गावी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. महत्वाचा सण असल्याने वर्षभर काम केल्यानंतर कुटुंबासोबत दिवाळी आनंदाने साजरी करण्याची इच्छा प्रत्येकाचीच असते. त्यामुळे पुणे तसेच परिसरात नोकरी करणारे अनेक जण काहीही करून गावाकडे जात असतात. एसटी बसची कमतरता किंवा बसण्यास जागा न मिळणे या कारणांमुळे अनेक प्रवासी खासगी बसचा पर्याय निवडतात. मात्र खासगी बसच्या तिकिटांचे दर अवाच्या सवा असल्याने आर्थिकदृष्ट्या ते न परवडणारे असते. त्यामुळे नियमाप्रमाणे खासगी बस व्यावसायिकांनी बसचे भाडे नियमानुसार घ्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली होती. त्यानुसार दिवाळीत प्रवाशांची लूट करणाऱ्या खासगी बस सेवा पुरवणाऱ्या

खासगी व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय पुणे आरटीओकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार आता खासगी बससेवा पुरवणाऱ्यांकडून जास्त भाडं आकारलं गेलं तर त्यांच्याविरोधात तक्रार करता येणार आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांकडून निर्धारित केलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारणी केल्यास प्रवाशांनी आरटीओच्या ८२७५३३०१०१  या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर तक्रार किंवा पुरावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यावर आतापर्यंत २८ तक्रारी आरटीओला प्राप्त झाल्या आहेत.  

ट्रॅव्हल्सना जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारण्याचा अधिकार

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने वाहतूक सेवेकरिता आकारण्यात येणाऱ्या भाड्याच्या जास्तीत जास्त दीडपटपर्यंत खासगी बस व्यावसायिकांना भाडे आकारण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित मार्गावर त्यापेक्षा अधिक भाडे आकारणी करणाऱ्या खासगी बसेसवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश मोटार वाहन निरीक्षक यांना देण्यात आलेले आहेत. अधिक भाडे आकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा आढळून आल्यास अशा वाहतूक पुरवठादारांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत खटला दाखल करण्यात येणार आहे.

नियमाप्रमाणे विविध मार्गांवरील खासगी 

बसचे ऑनलाईन तिकीट दर

(बसच्या कंपनीनुसार बदल असू शकतो )

पुणे ते अकोला २,२८६

पुणे ते नागपूर ३, ३००

पुणे ते मुंबई ४७६

पुणे ते नाशिक १,१००

पुणे ते धाराशिव १,२४९

प्रवाशांच्या तक्रारी आरटीओला प्राप्त झाल्या आहेत. अनेकांना अर्धवट माहिती पाठवली आहे. त्यामुळे प्रवाशांकडून सविस्तर माहिती मागवण्यात येत आहे. ज्या तक्रारी आल्या आहेत, त्या तक्रारींचा विचार करून संबंधित बस व्यावसायिकावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. प्रवाशांनी तक्रार करताना सविस्तर माहिती द्यावी.

 - संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.  

एसटी महामंडळाच्या बसपेक्षा खासगी बसमध्ये अधिक सेवा आणि सुविधा देण्यात येतात. स्लीपर एसी बससाठी नियमानुसारच भाडे घेतले जाते. वर्षभर खासगी बस सेवा ही एसटी बस तिकिटाच्या निम्म्या दराने सुरू ठेवली जाते. त्यावेळी कोणतीही तक्रार केली जात नाही. दिवाळीच्या सिझनमध्येही दोन पैसे जादा मिळण्याची अपेक्षा असते. तिकीट भाडे नियमानुसारच घेतले जाते. एसटी बस आणि खासगी बसमध्ये फरक आहे. त्यामुळे जे दर लावले ते कोणत्या आधारे ते समजत नाही. महामंडळाला कोणताही कर सरकारला भरावा लागत नाही. मात्र खासगी व्यावसायिकांना भरावा लागतो. याचाही विचार करण्याची गरज आहे. प्रवासी हा वर्षभर प्रवास करत नाही. त्यामुळे त्याला दिवाळीमध्येच दर जास्त वाटतात. आकारण्यात येणारे दर हे सामान्यच आहेत. - किरण देसाई, कार आणि बस असोसिएशन.

वर्षभर खासगी बसच्या तिकिटाचे दर एसटी बसच्या तिकिटाच्या निम्मे असते. त्यावेळी कोणतीही तक्रार नसते. वर्षभराचा विचार करूनच शासनाच्या कमिटीने आम्हाला दिवाळीत दीड पट भाडे घेण्याचा अधिकार दिला आहे. शहरातून बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्या तुलनेत येताना प्रवासी नसतात. अनेक वेळा बस मोकळ्या आणाव्या लागतात. खासगी बसमध्ये देण्यात येणाऱ्या सेवांची तुलना करता येणार नाही. रेल्वे, विमान यांचेही दर वाढलेले आहेत. त्याची चर्चा न होता केवळ खासगी बस व्यावसायिकांचीच चर्चा केली जाते. प्रवाशांची लूट न करता नियमाप्रमाणेच भाडे आकारले जाते. खर्चाचा विचार केला तर आताचे भाडेदेखील कमीच आहे.

 - प्रसन्न पटवर्धन, खासगी बस व्यावसायिक.

मला पुणे ते अकोला असा प्रवास करायचा होता. इतर वेळी ७५० रुपये खासगी एसी बससाठी भाडे आकारले जाते. मात्र दिवाळीमुळे साधारण बससाठी ३ हजार ५०० रुपये खासगी बसने प्रवासासाठी मोजावे लागले. ऑनलाईन पाहिले तर नियमानुसार दोन हजार १५५ रुपये साधारण बससाठी घेतले जातात. तर एसटी बससाठी १ हजार २१ रुपये तिकीट आकारले जाते. हे पाहिल्यानंतर खासगी बस व्यावसायिकाने जास्त तिकीट आकारले असल्याचे लक्षात आले. दिवाळी सणाला जाताना खासगी बसने प्रवास करताना आम्हा प्रवाशांचे दिवाळे निघत आहे.

 - अक्षय माने, प्रवासी.

८२७५३३०१०१ या क्रमांकावर सविस्तर करा तक्रार...  

एसटी  बस भाडेदराच्या दीडपटीपेक्षा जास्त भाडे खासगी बसने आकारल्यास त्यांच्या विरोधात  ८२७५३३०१०१  या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर तक्रार नोंदवावी. ही तक्रार नोंदवताना तिकिटाचा फोटो, मार्गाचे नाव, बसचा क्रमांक यासह इतर पुरावे देखील सादर करावेत, असे आवाहन प्रवाशांना पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest