Pimpri Chinchwad : शेडमध्ये झोपलेल्या सख्ख्या भावांचा गुदमरून मृत्यू; वाल्हेकरवाडीत दोन दुकानांना भीषण आग

दुकानाच्या पोटमाळ्यावर झोपलेल्या दोन सख्ख्या भावांचा आगीमुळे (Fire) होरपळून मृत्यू झाला. वाल्हेकरवाडी येथील जय मल्हार कॉलनी या परिसरात असलेल्या पत्र्याच्या शेडला सोमवारी (२२ जानेवारी ) मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Wed, 24 Jan 2024
  • 11:08 am
Pimpri Chinchwad

दुकानाच्या पोटमाळ्यावर झोपलेल्या दोन सख्ख्या भावांचा आगीमुळे (Fire) होरपळून मृत्यू झाला. वाल्हेकरवाडी येथील जय मल्हार कॉलनी या परिसरात असलेल्या पत्र्याच्या शेडला सोमवारी (२२ जानेवारी ) मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागली. महापालिका व स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची माहिती घेतली असून, त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. (Pimpri Chinchwad) 

या घटनेत ललित अर्जुन चौधरी (वय २१ वर्षे) आणि कमलेश अर्जुन चौधरी (वय २३ वर्षे, मूळ रा. राजस्थान) या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी असलेल्या गणेश पॅकेजिंग इंडस्ट्रीजमधील वखारीला आग लागली होती. त्या लगतच्या विनायक अ‍ॅल्युमिनियम प्रोफाइल डोअर असलेल्या दुकानाला आगीची झळ बसून, त्या दुकानाने पेट घेतला. या शेडला एकच दरवाजा असल्यामुळे आतमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन मोनॉक्साईड व कार्बन डाय-ऑक्साइडचा धूर झाला. तसेच त्या शेडमध्ये पोटमाळ्यावर अडकलेल्या दोन व्यक्ती धुरामुळे बेशुद्ध पडून आगीत अडकून पडले.

दरम्यान, सोमवारी मध्यरात्री २ वाजून २४ मिनिटांनी पिंपरी अग्निशमन नियंत्रण कक्षाला आग लागली असल्याची माहिती मिळाली. प्राधिकरण उप अग्निशमन केंद्र अग्निशमन वाहनाबरोबर पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्राचे २ व चिखली अग्निशमन केंद्र व थेरगाव अग्निशमन केंद्र प्रत्येकी एक अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना झाले. आगीने दोन्ही दुकानांना विळखा घातला होता. तसेच, स्विफ्ट मोटारही आगीत सापडली. ॲल्युमिनियमच्या फ्रेम व दोन दुचाकी खाक झाल्या.  फायर होज व होज रील होजच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवले. या परिसरातील रहिवाशांना पोलिसांच्या मदतीने इमारतीबाहेर स्थलांतरित करण्यात आले होते. अग्निशमन पथके घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी सदरील शेडचे दरवाजे उघडून ठेवले होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ४ अग्निशमन केंद्रातील एकूण ५ अग्निशमन वाहनांसह जवळपास ३५ ते  ४० अग्निशमन जवानांनी आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न केले.

महापालिकेच्या सर्वेक्षणाबाबत प्रश्नचिन्ह कायम

पूर्णानगर, चिखली भागात ऑगस्ट महिन्यात सचिन हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली होती. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला होता. चिमणाराम चौधरी (वय ४५ वर्षे), ज्ञानुदेवी चौधरी (वय ४० वर्षे), सचिन चौधरी (वय १० वर्षे), भावेश चौधरी (वय १५) अशी आगीत होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेनंतर शहरातील सगळ्या व्यावसायिक आस्थापनांचे सर्वेक्षण करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले होते. मात्र, त्यानंतरही तळवडे येथे स्पार्कल कॅण्डल कारखान्यात स्फोट होऊन १४ महिलांचा होरपळून मृत्यू झाला. दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. शहरात लागोपाठ या दोन भीषण घटना घडल्यानंतर पुन्हा दोघांचा बळी गेल्याने महापालिका लाखो रुपये खर्च करून सुरू असलेल्या सर्वेक्षणाबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.      

उशिरा येऊन झोपले अन् आगीत अडकले

अ‍ॅल्युमिनियम दुकानामध्ये झोपलेल्या कामगारांना संबंधित दुकानमालकांनी झोपण्याची सोय केली होती. मात्र, रात्री उशिरा आल्याने त्यांनी दुकानात झोपण्याचा निर्णय घेतला. दुचाकी तेथेच आतमध्ये लावून ते तेथील पोटमाळ्यावर झोपले. मात्र, मध्यरात्री आग लागली आणि अचानक लागलेल्या आगीत दोघेजण सापडले. दोघे मूळचे राजस्थान येथील असून, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करण्यात आला आहे.  

आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. या ठिकाणी सर्व्हे झाला नाही. अशाप्रकारे घटना होऊ नये, यासाठी तत्काळ येथील सर्व्हे करून त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल.

-मनोज लोणकर, प्रशासन अधिकारी, अग्निशमन विभाग

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story