'डीप क्लिन' मधील माती, कचऱ्याचे ‘बिग’ ढीग!
पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) स्वच्छतेची पातळी उंचावून त्यात सुधारणा करण्यासाठी विविध भागात स्वच्छता मोहीम (Cleanliness campaign) राबविण्यात येत आहे. त्यानुसार जुन्या पुणे - मुंबई महामार्गावरील ग्रेड सेपरेटरची (समतल वितलग) साफसफाई करण्यात आली. १२ किलोमीटरच्या मार्गावर आरोग्य विभागाने ५० टन माती व कचरा गोळा केला. ही साफसफाई करून चार दिवस उलटले तरीही जागोजागी माती आणि कच-याचे ढीग तसेच पडून आहेत. त्यामुळे मालवाहतूक आणि चारचाकी वाहनांच्या वेगाने मातीचा हवेत धुरळा उडू लागला असून हवा प्रदूषित होऊन दुचाकी वाहनचालकांच्या नाका-तोंडात माती जाऊ लागली आहे. त्यामुळे पालिका आरोग्य विभागाने स्वच्छता केली असली तरी माती व कच-याचे ढीग कधी उचलणार असा ‘बिग’ प्रश्न नागरिकांना पडला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार शहरातील सर्व भागात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत १८ ते २७ जानेवारी या कालावधीत दररोज सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सखोल स्वच्छता मोहीम घेण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेत मंदिरे, रस्ते, चौक, समूह शिल्पे आणि परिसर स्वच्छ पाण्याने धुण्यात येत आहे. तसेच रस्त्यावरील माती, कचरा गोळा करून रस्त्यांचे दुभाजकही पाण्याने स्वच्छ केले जात आहेत.
महापालिकेतर्फे शहरातील प्रमुख १७ रस्त्यांवर सखोल स्वच्छता अभियान राबविण्यास सुरूवात झाली आहे. या अभियानांतर्गत शुक्रवारी, दि. १९ रोजी सकाळी निगडी ते दापोडी या मार्गाच्या दोन्ही बाजूला सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात तब्बल ५० टन माती, कचरा गोळा करण्यात आला. तसेच पाण्याने रस्ते दुभाजक धुवून काढण्यात आले. या अभियानात सुमारे १ हजार २०० कर्मचा-यांनी सहभाग घेतला होता.
शहरातील नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता शुक्रवारी सकाळी ६ ते १० पर्यंत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर थेट १२ किलोमीटरचा रस्ता बंद केला होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे शाळा, कॉलेज आणि नोकरी-कामधंद्यासाठी पुण्याच्या दिशेने जाणारे पिंपरी-चिंचवडकर वाहतूक कोंडीत अडकून पडले होते. त्या दिवशी प्रचंड मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागला होता.
दरम्यान, महापालिका आरोग्य विभागाने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर तब्बल ५० टन माती, कचरा गोळा केला. रस्ते स्वच्छ पाण्याने धुतले. मात्र, महामार्गावर अनेक ठिकाणी कचरा, मातीचे ढीग तसेच ठेवण्यात आले आहेत. सदरची माती व कचरा उचलण्यात आलेला नाही. अनेक मालवाहतूक करणारी वाहने वेगात गेल्यावर ती माती हवेत उडत आहे. त्यामुळे हवेत धुरळा उडून वाहन चालकांना प्रचंड त्रास होत आहे. जागोजागी गोळा करून ठेवलेले माती व कच-याचे ढीग उचलण्यात आलेले नाहीत. ते ढीग जागेवरच ठेवून कामगार गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाहनचालकांतून संताप व्यक्त होत आहे.
स्वच्छता कमी अन् फोटो सेशन जास्त?
महापालिकेने शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबविली. शहरातील सर्व मंदिरे, शाळा, रस्ते, चौक, समूह शिल्प आणि परिसराची साफसफाई करण्यात येत आहे. ही स्वच्छता मोहीम करताना राजकीय नेते मंडळी, प्रशासकीय अधिकारी, माजी नगरसेवकांकडून स्वच्छता मोहिमेचा इव्हेंट साजरा करत फोटो सेशन केले जात आहे. स्वच्छता कमी आणि फोटो, व्हीडीओ अधिक अशी परिस्थिती दिसून येत आहे.
शहरातील विविध रस्त्यांवर सखोल स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी ७ ते १० या वेळेत निगडी ते दापोडी या मार्गावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये तब्बल ५० टन कचरा, माती गोळा करून कचरा डेपोमध्ये डंपिंग केला आहे. काही ठिकाणी चुकून कर्मचाऱ्यांनी माती व कच-यांचे ढीग ठेवले असतील तर आरोग्य कर्मचा-यांकडून तातडीने उचलण्यात येतील.
- यशवंत डांगे - सहायक आयुक्त,
आरोग्य विभाग, महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.