शरद पवार, उद्धव ठाकरे फेक नरेटिव्ह फॅक्टरीचे मालक

विरोधकांकडून रोज उठून अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला गेले आहेत, असा अपप्रचार त्यांनी सुरु केला आहे. महाराष्ट्रात औद्योगिकीकरण होत नाही असं ते म्हणतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 8 Nov 2024
  • 01:24 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

वाकड येथील जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, शहराला पाणी कमी पडू देणार नसल्याची दिली ग्वाही

विरोधकांकडून रोज उठून अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला गेले आहेत, असा अपप्रचार त्यांनी सुरु केला आहे. महाराष्ट्रात औद्योगिकीकरण होत नाही असं ते म्हणतात. मात्र आज देशात जेवढी गुंतवणूक आली आहे त्यातील ५२ टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आली आहे. याउलट महाविकास आघाडी सरकारच्या काळात कर्नाटक पहिल्या क्रमांकावर तर आपला महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेला होता. मात्र महायुती सरकारच्या काळात आपला महाराष्ट्र पुन्हा नंबर १ वर आणण्याचे काम आम्ही केले. त्यामुळे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे हे या फेक नरेटिव्हचे मालक असल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा वाकड येथील कस्पटे वस्ती येथे पार पडली. यावेळी गुजरातचे माजी गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे यांच्यासह महायुतीचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

फडणवीस म्हणाले की,  पिंपरी-चिंचवड शहर हे वेगाने वाढणारे शहर आहे. या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आपण शहरासाठी आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी दिले. आणि आता भामा आसखेड धरणातून १६० एमएलडी पाणी योजनेचे भूमिपूजन केले आहे. एवढ्या पाण्याने शहराची तहान भागणार नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या धरणातून शहराला पाणी आणण्यासाठी उपाययोजना करू. मी या शहराला पाणी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही यावेळी दिले.

मेट्रो-रिंग रोड वाहतूक कोंडीची समस्या सुटेल

चिंचवड विधानसभा मतदारसंघात वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. ही समस्या सोडवण्यासाठी शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम सुरू केले आहे. मेट्रो आणि पीएमपीएलच्या माध्यमातून नागरिकांना पब्लिक ट्रान्सपोर्ट कसा सुरू करून देता येईल यासंदर्भात काम करत आहोत. मेट्रोचे जाळे आपण विणत आहोत. त्याचबरोबर ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी २० हजार कोटी रुपयांचे रिंगरोडचे काम सुरू होणार आहे. त्यामाध्यमातून लवकरच वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.

अफवा पसरवून हिंजवडीची बदनामी करू नका

फेक नरेटिव्हच्या दुसऱ्या डायरेक्टर सुप्रिया सुळे म्हणतात की, हिंजवडीतून आयटी उद्योग पळाले. परंतु हिंजवडीतून एकूण १६ उद्योग राज्याबाहेर न जाता राज्यातीलच नाशिक, संभाजीनगर, नागपूर या भागात गेले आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या १६ उद्योगांपैकी १३ उद्योग हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेले होते. व महायुतीच्या काळात फक्त ३ उद्योग गेले आहेत. त्यामुळे फेक नरेटिव्हच्या माध्यमातून हिंजवडीला व महाराष्ट्राला बदनाम करणे बंद करा, असा सल्ला फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना दिला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest