वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांना ‘राष्ट्रपती पदक’
प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांना झालेल्या राष्ट्रवती पदकांमध्ये यंदा पिंपरी-चिंचवड पोलीस (Pimpri-Chinchwad Police) आयुक्तालयांतर्गत कार्यरत असलेले वरिष्ठ निरीक्षक वसंत बाबर (Vasant Babar) यांना देखील गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील चोपडी हे मूळगाव असलेले वसंत बाबर यांनी राहुरी विद्यापीठातून एमएस्सी ॲग्रीचे शिक्षण घेतले आहे. डिसेंबर १९९६ मध्ये उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात ते दाखल झाले. ३ जून २०१४ रोजी त्यांना निरीक्षकपदी बढती मिळाली. मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे ग्रामीण व सध्या पिंपरी-चिंचवड पोलीस दलामध्ये ते कर्तव्य बजावत आहेत. आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात त्यांनी सेवा केली. सेवा कालावधीमध्ये खून प्रकरणी दाखल असलेल्या संवेदनशील सहा गुन्ह्यांची उकल केली. तसेच दरोडे, जबरी चोरी, घरफोडी चोरी व इतर मालमत्तेच्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल केलेली आहे. बलात्कार प्रकरणी दाखल तीन गुन्ह्यांतील संशयितांविरुध्द उत्कृष्ट तपास करून दोषारोप दाखल केल्यानंतर सुनावणी दरम्यान संशयिताना शिक्षा झाली. नुकतेच घरफोडी चोरी करणारे अट्टल चोरट्यास अटक करून १८ घरफोडी चोरीतील एक किलो सोन्याचे दागिने जप्त करण्याची कामगिरी केली. या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना २०२४ चा गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे राष्ट्रपती पकद जाहीर करण्यात आले.
सेवाकाळात ३५१ बक्षीस, २३ प्रशस्तीपत्र
वसंत बाबर यांना सेवा कालावधीत आत्तापर्यंत ३५१ बक्षीस आणि २३ प्रशस्तीपत्रक प्राप्त झाले आहेत. २०१४ मध्ये सेवा कालावधीतील गुणवत्तापूर्ण सेवेसाठी महाराष्ट्र राज्याचे “पोलीस महासंचालक पदक’’ देऊन गौरवण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते देखील बाबर यांना सन्मानित करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.