पुणे-सोलापूर महामार्गाला फ्लेक्समुक्तीचे स्वप्न!
पुणे-सोलापूर महामार्ग चकाचक झाला आहे. महामार्गावर पुन्हा अनधिकृत फ्लेक्स (Unauthorized flex) लावले तर त्यांच्यावर पोलीस प्रशासन कडक कारवाई करणार असल्याचा इशारा लोणी काळभोर पोलीस (Lonikalbhor Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण (Shashikant Chavan) यांनी दिला आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणतर्फे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर-सोलापूर दरम्यान, रस्त्याच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूंकडील सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. तत्पूर्वी प्राधिकरणने रस्त्याची डागडुजी, साफसफाई सुरू केली आहे. या कामाची सुरुवात मागील चार दिवसांपूर्वी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यापासून करण्यात आली आहे.
प्राधिकरणकडून पुणे-सोलापूर महामार्गावरील रस्त्याच्या दोन्ही बाजूचा कचरा व माती गोळा करण्यात येत आहे. तसेच महामार्गावर लावलेले अनधिकृत फ्लेक्स काढले जात आहेत. त्याचबरोबर रिफ्लेक्टरवर चिटकवलेले फ्लेक्स काढून बॅरिकेड्स स्वच्छ पुसून घेण्यात येत आहेत.
महामार्गावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फ्लेक्स व होर्डिंग्ज आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस लावलेले होर्डिंग्ज प्रवाशांसाठी अडचणीचे ठरत असून, त्यामुळे प्रवासी, पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोलनाका, वाकवस्ती, लोणी स्टेशन, लोणी कॉर्नर, माळी मळा, थेऊरफाटा, कुंजीरवाडी चौक, नायगाव फाटा, पेठ वाकडा पूल, सोरतापवाडी फाटा, इनामदारवस्ती, एलाईट चौक, तळवाडी चौक व खेडेकर मळा या भागात असंख्य अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्ज धोकादायकरित्या लावलेले आहेत. महामार्गावर काही ठिकाणी तर व्यवसायाची जाहिरात करणारे छोटे फ्लेक्स रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विद्युत खांबांवर अथवा रिफ्लेक्टरवर चिटकवलेले आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. सध्यातरी ही कारवाई कदमवाकवस्ती परिसरात सुरू आहे. मात्र, ही कारवाई तशीच पुढे चालू राहणार की नाही याकडे पूर्व हवेलीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्ज लावले आहेत. हे फ्लेक्स भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने काढले आहेत. त्यामुळे महामार्गाने मोकळा श्वास घेतला आहे. आता महामार्गावर किंवा महामार्गालगत असे फ्लेक्स, होर्डिंग्ज लावून विद्रुपीकरण केले तर अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यासह जागा मालकावर गुन्हा दाखल करणार आहे.
- शशिकांत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.