संग्रहित छायाचित्र
महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाच्या तिजोरीमध्ये आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये ४३२ कोटी रुपयांचा मालमत्ताकर संकलित करण्यात आला. शहरामध्ये निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमिनी आदी अशा एकूण ६ लाख ३० हजारांहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता असून, यावर्षी त्यापैकी ५४ टक्के करदात्यांनी पहिल्या तिमाहीमध्येच मालमत्ताकर भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. करदात्यांनी जागरूकपणे कर भरून सवलतींचा लाभ घेतल्याने महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी जागरूक करदात्यांचे आभार मानले आहेत.
नागरिकांनी मालमत्ताकर भरण्यासाठी करसंकलन विभागाने विविध उपाययोजना राबवल्या. त्याच्या माध्यमातून करदात्यांपर्यंत मालमत्ताकरावरील सवलतीबाबत विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली. यामुळे नागरिकांना सवलतीबाबत माहिती होऊन नागरिकांनी पहिल्या तिमाहीमध्येच आपला मालमत्ताकर भरण्यासाठी प्राधान्य दिले आहे. सवलतीबाबत जनजागृती झाल्याने परिणामी, सन २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण मालमत्ताधारकांपैकी ५४ टक्के मालमत्ताधारकांनी मालमत्ताकर भरला.
७३ टक्के करदात्यांनी भरला ऑनलाइन स्वरूपात कर
शहरातील एकूण मालमत्ताधारकांपैकी ३ लाख ५७ हजार ११ इतक्या मालमत्ताधारकांनी ४३२ कोटींचा कर जमा केला असून त्यापैकी २ लाख ६२ हजार ५२२ इतक्या म्हणजेच ७३ टक्के मालमत्ताधारकांनी ऑनलाइन स्वरूपात कर भरून सवलतींचा लाभ घेतला आहे.
निवासी मालमत्ताधारकांकडून मालमत्ताकराचा भरणा
गतवर्षीप्रमाणे यावर्षीही पालिकेने राबविलेल्या 'सिद्धी' प्रकल्पातून सुमारे ४०० महिलांनी मालमत्ताधारकांना बिलाचे वाटप केले, त्यामुळे नागरिकांनी ३० जूनपर्यंत सवलतींचा लाभ घेत कराचा भरणा केलेला आहे, तसेच विभागातील सर्व कर्मचाऱ्यांची सांघिक कामगिरी केली असून त्यामुळे करवसुलीमध्ये सातत्य ठेवण्यात विभागाला यश आले आहे. कर संकलनाच्या १७ झोनपैकी वाकडमध्ये सर्वाधिक ४९ हजार ३६ नागरिकांनी ६८ कोटी, तर पिंपरीनगर झोनमध्ये सर्वात कमी ३ हजार ९८२ मालमत्ताधारकांनी फक्त 3 कोटींचा कर भरला आहे, तसेच सर्वाधिक ३ लाख ११ हजार ६७ निवासी मालमत्ताधारकांनी तब्बल २६० कोटींच्या कराचा भरणा केला आहे, असे करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.
शहरातील सर्व जबाबदार, प्रामाणिक आणि जागरूक करदात्यांनी यावर्षीही पहिल्या तिमाहीमध्ये कर भरून सवलतींचा लाभ घेतला आहे. त्याबद्दल सर्व जागरूक करदात्यांचे मनापासून आभार मानतो. शहरातील करदात्यांसाठी विभागाने जाहीर केलेल्या विविध योजनांचा लाभ घेत कराचा भरणा केल्याने शहराच्या प्रगतीमध्ये करदात्यांचा मोलाचा वाटा आहे.
-शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
करसंकलन विभागाद्वारे नागरिकांना मालमत्ताकरावरील सवलतींचा लाभ घेण्यासाठी जनजागृतीद्वारे, एसएमएसद्वारे आवाहन करण्यात आले. करसंकलन विभागाने प्रकल्प 'सिद्धी' उपक्रमांतर्गत बिलांच्या केलेल्या वाटपाचा यामध्ये मोलाचा वाटा असून, विभागाने प्रत्येक आघाडीवर घेतलेल्या पुढाकारामुळे यावर्षी ४३२ कोटींचा कर जमा झाला आहे. नागरिकांनी वेळेवर कर भरून सवलतींचा लाभ घेतला, यामुळे त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
- नीलेश देशमुख, सहाय्यक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.