संग्रहित छायाचित्र
वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्यावतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जन्मदिनी व कृषि दिनानिमित्त यंदाचा वसंतराव नाईक पुरस्कार डॉ. भाग्यश्री प्रसाद पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आधुनिक फुल शेतीतील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री धनंजय मुंडे, विशेष अतिथी म्हणून महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार गुलाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र बारवाले यांनी मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथे संपन्न झाला. डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या प्रयोगशील आणि नाविन्यपूर्ण विचारांमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवे मार्गदर्शन मिळाले आहे. त्यांच्या कार्यामुळे शेती क्षेत्रात नवीन युगाची सुरुवात झाली असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री शिंदे यांनी काढले. शेतीमध्ये नवकल्पनांचा वापर करणे आजच्या काळाची गरज आहे आणि डॉ. पाटील यांनी हे सिद्ध केले आहे, योग्य दृष्टिकोन आणि कष्ट यांच्या जोरावर शेतीतूनही मोठे यश मिळवता येते." याशिवाय, "कृषी क्षेत्रातील अशा नवोदित तंत्रज्ञानांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करणे आपली जबाबदारी असल्याचेही शिंदे म्हणाले. तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पुरस्कार वितरण समारंभात बोलताना म्हणाले, भाग्यश्री पाटील यांच्या आधुनिक व नाविन्यपूर्ण पद्धतींमुळे फुलशेतीच्या क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती झाली आहे. त्यांचे योगदान शेतकऱ्यांसाठी तसेच आगामी पिढ्यांसाठी एक प्रेरणास्थान ठरले आहे. कृषी औद्योगिक क्षेत्रात अमुलाग्र अशी कामगिरी साध्य करणारे, आपले संपूर्ण आयुष्य शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झिजवणारे, हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांचा आशीर्वाद मला या कृषि पुरस्कारातून मिळाला आहे. आजचा हा सन्मान माझ्या भविष्याच्या कार्याला मिळालेली प्रेरणा असल्याचे मी समजते. या वाटचालीत खंबीरपणे साथ देणारे माझे पती डॉ पी. डी. पाटील आणि माझे कुटूंबीय तसेच राईज एन शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व हितचिंतक यांचे या यशामध्ये महत्त्वाचे योगदान असल्याचे डॉ. भाग्यश्री पाटील म्हणाल्या.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.