मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक फायदा पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महिलांना झाला आहे. अण्णा बनसोडे यांनी यासाठी चांगले काम केले. अण्णांचा प्रवास प्रेरणादायी आहे. करोना काळात शहरातील नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी अण्णा बनसोडे यांनी 25 लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. तसेच इतर आरोग्यविषयक सुविधांसाठी सव्वा कोटींचा निधी दिला. त्यामुळे अण्णा बनसोडे हे सामाजिक भान जपणारा नेता आहेत, असे गौरव व अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. तसेच आमदार अण्णा बनसोडे यांना तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन देखील केले.
काळभोरनगर आकुर्डी येथे महायुतीचा मेळावा पार पडला. मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, सदाशिव खाडे, संदीप वाघेरे, योगेश बहल, कुणाल वाव्हळकर, चंद्रकांता सोनकांबळे, कविता अल्हाट, अनुप मोरे, हाजीभाई शेख, सुजाता पालांडे, बाळासाहेब वाल्हेकर, शत्रुघ्न काटे, वर्षा जगताप, वैशाली काळभोर, माई काटे, संजय काटे, निलेश तरस, राजेश वाबळे, शैला पाचपुते, सरिता साने, युसुफ कुरेशी, तुषार हिंगे आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, अण्णा बनसोडे हे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. त्यांचा संपर्क चांगला आहे. त्यांना त्यांचे काम करू द्या. अण्णा बनसोडे आणि महायुती यांच्यामध्ये समन्वय राखण्याचे काम योगेश बहल हे करतील. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली. त्यामुळे उद्योग नगरीसह या शहराची मिनी भारत म्हणून ओळख झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरावर माझे प्रेम आहे.
लक्ष्मण जगताप हे माझे कार्यकर्ते होते. तसेच महेश लांडगे हे देखील माझेच कार्यकर्ते आहेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींना उजाळा दिला. या निवडणुकीतील माघार घेतलेल्या उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले. 21 जणांनी माघार घेतली. त्यातील 19 जणांनी आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिला. त्या उमेदवारांचे उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले तसेच आभार मानले.
अजित पवारांनी दिले सल्ले
ही निवडणूक हलक्यात घेऊ नका. कोणीही गाफील राहू नका. वाजपेयींचे सरकार एका खासदारामुळे पडले होते. त्यामुळे आपल्याला एक एक जागा महत्त्वाची आहे. कुठेही नकारात्मक बोलू नका. योगेश बहल हे महायुतीमध्ये समन्वय ठेवतील. पुढील काळात विरोधक चुकीच्या गोष्टी पसरवतील अफवांवर विश्वास ठेवू नका, असे सल्ले अजित पवार यांनी दिले.
विरोधकांनी मोठ्या घोषणा केल्या पण...
अजित पवार म्हणाले, विरोधकांकडून पंचसूत्रीच्या नावाखाली मोठमोठ्या घोषणा केल्या. महिलांना तीन हजार रुपये देणार असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले. आम्ही 1500 रुपये देत असताना राज्याची तिजोरी खाली झाल्याचा आरोप करण्यात आला. मग आता हे तीन हजार रुपये कुठून आणणार हा प्रश्न आहे. आम्ही अशा योजना राबविताना आर्थिक नियोजन केले आहे. राज्यातील ग्राहकांना एक युनिट वीज पुरविण्यासाठी सात रुपये खर्च येतो. मात्र सोलर द्वारे निर्मित झालेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी साडेतीन रुपये खर्च येतो. त्यातील शिल्लक राहिलेले पैसे आम्ही शेतकऱ्यांसाठी देणार आहोत. आम्ही कुठलीही जादूची कांडी फिरवली नाही. आम्ही केवळ आर्थिक नियोजन केले. विरोधक लोकांना फसविण्याचे काम करत आहेत. हा त्यांचा चुनावी जुमला आहे.
महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर
भारतात आलेल्या विदेशी गुंतवणुकी पैकी 52 टक्के गुंतवणूक केवळ महाराष्ट्रात आहे. जेएसडब्ल्यू, किर्लोस्कर, हुंदाई, टोयोटा असे मोठे प्रकल्प राज्यात आले आहेत. महाराष्ट्र परदेशी गुंतवणूकीत देशात क्रमांक एकवर आहे. महाराष्ट्राची पिछाडी झाल्याचे विरोधकांकडून फेक नरेटीव सेट केला जात आहे.
सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न
माधुरी महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या एकूण जागांपैकी दहा टक्के जागा मुस्लिम, 12 टक्के जागा अनुसूचित जाती, 12 टक्के जागा अनुसूचित जमाती आणि दहा टक्के जागा महिलांना दिल्या आहेत. एकूण 44 टक्के जागा सर्व समाज घटकांना दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न असल्याचे पवार म्हणाले.
पिंपरी-चिंचवड शहरासाठी अजितदादांचे धोरण
पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहराला आणखी जास्त पाणीपुरवठा उपलब्ध करणे गरजेचे आहे. शहराला टाटा धरणातून पाणी आणावे लागेल. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोड बनवला जात आहे. पीएमपीएमएल सक्षम केली जात आहे. मेट्रोचे जाळे वाढवले जाते आहे. शहरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणखी जास्त राबवावे लागतील. पिंपरीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील जागेवर माता रमाई स्मारक होणार आहे. हे स्मारक नावाला साजेसे होणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.