पिंपरी-चिंचवड: रावेत चौकात अपघाताला निमंत्रण; भर रस्त्यात धोकादायक पद्धतीने उभारलेत बॅरिकेट्स

आकुर्डी ते रावेत या रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभारलेले बॅरिकेट्स अपघाताला निमंत्रण देत असून, यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, रावेत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात.

संग्रहित छायाचित्र

ठिकठिकाणी केलेल्या खोदकामामुळे होतेय वाहतूककोंडी

पंकज खोले
आकुर्डी ते रावेत या रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभारलेले बॅरिकेट्स अपघाताला निमंत्रण देत असून, यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला  सामोरे जावे लागत आहे. परिणामी, रावेत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. त्यामुळे या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

रावेत ते किवळे या मार्गावर वाहनाची ये -जा वाढली आहे. त्याचप्रमाणे रावेत येथील चौकात ताथवडे तसेच, वाल्हेकरवाडी आणि आकुर्डी या चारही बाजूंनी वाहनांची वर्दळ असते. लगतच पुणे-बंगळूर महामार्ग आणि पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे असल्याने अवजड, प्रवासी वाहने देखील या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मात्र, आकुर्डीपासून ते रावेत चौकापर्यंत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था आहे. त्यातच या चौकाच्या अलीकडेच खोदकाम केलेला रस्ता पूर्ववत करण्यात न आल्याने मातीचा ढिगारा तसाच आहे. त्यामुळे या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहे. मात्र हे बॅरिकेट्स वाहनांना अडथळा ठरत असून, अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे. रस्त्याच्या मधोमधच दोन बॅरिकेट्स उभे केल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वेगात येणारी वाहनांना ब्रेक लावा लागतो. त्यातच वाहनांचा वेग अचानक कमी झाल्याने पाठीमागून येणारे वाहनांचा धक्का बसून अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

रावेत, किवळे परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये सोसायट्यांची संख्या विस्तारत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. मात्र, रस्ते व इतर सुविधा नसल्याने येथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रावेत येथील चौकात वाहतूक कोंडीची कायम समस्या असते. त्यातच ठिकठिकाणी करण्यात आलेले खोदकाम आणि अशाप्रकारे धोकादायक पद्धतीने उभारण्यात आलेले बॅरिकेट वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर टाकत आहेत. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या बेशिस्त वाहतूक, अतिक्रमण आणि अरुंद व अपुरे रस्ते वाहनचालकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यातच महापालिका अशाप्रकारे चुकीच्या कारभारावर पांघरूण घालत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही समस्या हटवून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

किवळे -रावेत बीआरटीला अडथळा

रावेत ते किवळे या रस्त्यावरील बीआरटीमध्ये पाण्याची वाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे बीआरटी मार्ग बंद असल्याने प्रवासी बसेस बाहेरील मार्गातून ये-जा करत आहेत. परिणामी, वाहतूक कोंडीमध्ये आणखीच भर पडत आहे.

"रावेत चौकातील सिग्नल वारंवार बंद पडतो. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होत असते. त्यातच या चौकाच्या अलीकडेच आकुर्डीच्या दिशेला रस्त्यातच दोन बॅरिकेट्स उभारण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी हे दृष्टीस पडत नाही."

-विवेक जांभेकर, स्थानिक नागरिक, रावेत

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest