इंद्रायणी नदीतील सांडपाणी, रसायनमिश्रित व दूषित पाण्याची नदीपात्राबरोबरच परिसरातील गावांनाही बाधा पोहचू लागली आहे. कुरुळी, मोई, चिंबळी, निघोजे आदी परिसरातील पाण्याचे स्रोत दूषित झाले. ही नदी लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असून, तालुक्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जात होती. आता त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की या नदीच्या प्रदूषणाबाबत लक्ष देण्यास कोणाकडे वेळ नाही. दूषित पाण्याबरोबर कचरा प्लास्टिक आणि निर्माल्याही मोठ्या प्रमाणात नदीच्या कडेला साचले आहे. नदीत दिवसाआड केमिकलयुक्त फेस येत आहे.
श्रीक्षेत्र देहूपासून ते आळंदीदेवाचीपर्यंत इंद्रायणी नदीलगतच्या गावांमधून तसेच पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारी गटारे, नाल्यांतील दूषित व रसायनमिश्रित पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पुलावरून ठिकठिकाणी कचरा, राडारोडा, टाकण्याचे काम राजरोसपणे चालू आहे. या प्रकारामुळे इंद्रायणी गटारगंगा झाली असून, आता इंद्रायणी नदीमध्ये जलपर्णी वाढू लागली आहे.
नदीतील सांडपाणी व रसायनमिश्रित पाण्यामुळे शेतीपिकाला तसेच शेतकऱ्यांना त्रास होत आहे. शेतकऱ्यांच्या अंगाला खाज सुटते. डासांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना शेतात काम करणे अवघड झाले आहे. पिकांचे उत्पादन कमी व खर्च जास्त होत आहे. तसेच परिसरातील गावांतील ग्रामस्थांना दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी टँकरने पाणी घ्यावे लागत आहे., ग्रामस्थांबरोबरच शेतीचे आरोग्यही धोक्यात आले आहे. प्रदूषणामुळे जलचर देखील नाहीसे होत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना अनेकदा तक्रार करूनही ठोस कारवाई होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.. परिसरातील काही कंपन्या दूषित पाण्यावर प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात पाणी सोडतात अशा कंपन्यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न इंद्रायणी नदीलगतच्या ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
इंद्रायणी नदी ठिकठिकाणी प्रदूषित होत असून, कुबेर गंगा ओढा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, नदीपात्रामध्ये थेट सांडपाणी मिसळले जात आहे. त्याचप्रमाणे इंद्रायणी हॉस्पिटल आणि परिसरातील भागातही मोठ्या प्रमाणात नदीवर तवंग आले आहेत. त्याचप्रमाणे हे नदीचे पाणी परिसरामध्ये शेतामध्ये शिरत असल्याने शेती देखील धोक्यात आली आहे.
कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर दखल घ्यावी
आळंदी कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर नुकतीच बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत वाहनाच्या पार्किंग बरोबरच इंद्रायणी नदीला सोडण्यात आलेल्या पाण्यावरती चर्चा झाली. त्याच अनुषंगाने प्रदूषणाबाबत देखील उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. सध्या आचारसंहिता असल्याने निवडणुकीच्या कामांमध्ये प्रशासन अधिकारी व्यस्त आहेत. येत्या 23 तारखेपासून ते 30 पर्यंत कार्तिक यात्रा पार पडणार आहे. या बैठकीला पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी अनुपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.