Maha Uti ,Maha Vikas Aghadi ,Assembly elections,Bapusaheb Bhegde,Vikas Aghadi
टाकवे : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना होत असताना मावळमध्ये मात्र सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. याचे आत्मचिंतन विरोधकांनी करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश भेगडे यांनी केले.
अपक्ष व जनतेचे उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचारार्थ आज आंदर मावळातील राजपुरी, बेलज, टाकवे, फळणे, माऊ, वडेश्वर नागाथली, वहाणगाव, कुसवली, बोरवली, कांब्रे, डाहुली, कुसुर, खांडी, निळशी, सावळा, माळेगाव खुर्द, तळपेवाडी आदी गावांमध्ये प्रचारदौरा झाला. मतदारांनी प्रत्येक गावात फुलांच्या पायघड्या, फुलांच्या पाकळ्यांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करीत स्वागत केले. महिलांनी औक्षण करीत विजय तिलक लावला. यावेळी या सर्व गावांच्या ग्रामस्थानसह शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, गुलाबराव म्हाळसकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना गणेश भेगडे म्हणाले, की मावळातील एका गावातील रस्त्यासाठी ४२ लाख रुपये खर्च केले. पण रस्ताच अस्तित्वात नाही. कान्हे येथील पुलासाठी पैसा खर्च केला, प्रत्यक्षात पूल, रस्ता हरवला आहे, अशा तक्रारी द्याव्यात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसाने नम्र असावे, मीपणा रावणाचा अंत करून गेला, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे.
आमदार शेळके यांनी कार्यकर्ते संकल्पना संपुष्टात आणली. मलिदा गँगचे यांचे कार्यकर्ते असतील, तर यांचा अध्यक्ष कोण, असा सवालही गणेश भेगडे यांनी केला. आमदार शेळकेंच्या भोवतीच पोलिसांचा गराडा असेल, तर ते तुम्हाला सुरक्षा काय देणार ? विकासाचा पंचनामा करणार आहोत असा इशाराही गणेश भेगडे यांनी यावेळी दिला.
मावळची संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय. खोटे बोलून नको त्या विकासाच्या गप्पा मारू नका. विद्यमान आमदाराने तालुक्याची लिमिटेड कंपनी करून टाकली आहे, असे होऊ द्यायचे नसेल, तर परिवर्तन घडवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. विद्यमान आमदारांनी प्रत्येक घटकाला दुखावण्याचे काम केले आहे. गाव संघटित ठेवण्यासाठी, गावगाडा चालवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहून प्रयत्न करण्याची आवश्यकता असते.
टाकवे गावातून कंपन्या बाहेर का गेल्या, दूध व्यवसाय येथून स्थलांतरित का झाले याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे का नाही ? कान्हे येथील पूल अद्याप का केला गेला नाही. हा पूल झाला असता तर इंडस्ट्री बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता. इंडस्ट्रीज बाहेर गेल्यामुळे तरुणांना रोजगार देणे देखील कठीण बनले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात हा पूल होणं आवश्यक होतं. महिला सक्षमीकरण तरुणांच्या हाताला काम हेच आपले व्हिजन आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.