आणखी किती लोकांचे बळी घेणार?
पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील आगीच्या घटनांत बळी जाणाऱ्यांची संख्या पाहता हे महापालिका (PCMC) प्रशासन झोपा काढतेय का, असा प्रश्न पडतो. आणखी किती बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का, असा खडा सवाल माजी नगरसेविका आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे (Sima Salve) यांनी केला आहे. तळवडे, रुपीनगर आणि आता वाल्हेकरवाडी येथील निष्पाप नागरिकांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याच्या सर्व घटनांचा आढावा घेतला तर, या महापालिका प्रशानावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. शहरातील ७०-८० टक्के अस्थापनांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा आजही नसल्याचे वारंवार उघडकीस येऊनही प्रशासन निव्वळ बघ्याची भूमिका घेणार असेल तर, जन आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही सीमा सावळे यांनी दिला आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात सीम सावळे म्हणतात, तळवडे येथील एका स्पार्कल कॅण्डल कारखान्याला आग लागली आणि निष्पाप १२ महिलांचा होरपळून मृत्यू झाला. तत्पूर्वी यापूर्वी पुर्णानगर येथील एका हार्डवेअर दुकानातील पोटमाळ्यावर राहणाऱ्या कुटुंबातील पाच जणांचे आख्खे कुटुंबच आगीत होरपळून संपले. आता दोनच दिवसांपूर्वी वाल्हेकरवाडी येथील एका लाकडाच्या वखारीची आग शेजारील दुकानात पोहचली आणि पोटमाळ्यावर राहणाऱ्या दोघा सख्या भावांचा होरपळून मृत्यू झाला. पुर्णानगर येथील दुर्घटनेनंतर शहरात आग प्रतिबंधक यंत्रणा किती आस्थापनांकडे आहे किंवा अशी दुर्घटना घडली तर काय तजवीज आहे याबाबत सर्वेक्षण करण्याची मागणी मी स्वतः दोनवेळा महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार बऱ्यापैकी पाहणीचे काम झाले पण, ज्यांच्याकडे आग प्रतिबंधक यंत्रणाच उपलब्ध नाही अशा एकावरही प्रशासनाने कारवाई केलेली नाही, असे सीमा सावळे यांनी निदर्शनास आणले आहे.
परराज्यातून शहरात स्थायिक झालेले बहुःतांश किराणी, स्विट मार्ट आणि हॉटेल्समधून बेकायदा पोटमाळे तयार करून कामगारांच्या निवासाची सोय केली जाते. कामगारांच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था पाहिजे मात्र पैसे वाचविण्यायासाठी निवासासाठी पोटमाळ्यांचाच वापर केला जातो. महापालिका प्रशासनाला हे लक्षात आणून दिले आणि अशा व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणीसुध्दा केली होती. प्रत्यक्षात पोटमाळ्यावर बिऱ्हाड करणाऱ्यांवर अजून कारवाई झालेली नाही. आगीत हकनाक बळी गेलेल्यांच्या मृत्युला हे भ्रष्ट महापालिका प्रशासनाच आहे. आणखी किती बळी घेणार आहात, असा सवाल सिमा सावळे यांनी केला आहे. या सर्व घटना अत्यंत दुर्दैवी असून टक्केवारीच्या धुंदीत असलेल्या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी सावळे यांनी केली आहे.
महापालिकेच्या भ्रष्ट, निगरगट्ट, असंवेदनशील प्रशासनाच्या कामकाजाचेच हे निष्पाप बळी आहेत. प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त शेखर सिंह, अग्नी प्रतिंबधक विभाग प्रमुख, अवैध बांधकाम नियंत्रण विभाग प्रमुख म्हणून संबंधित प्रभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, बीट निरीक्षक यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, असेही सावळे यांनी निवेदनात म्हटले आहे. भ्रष्टाचारात गुंतलेल्या प्रशासनाला वेळ मिळत नसेल तर जनतेच्या रोशाला त्यांना सामोरे जावे लागेल. प्रसंगी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सावळे यांनी दिला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.