Extortion demanded : वनीकरणाची जमीन विकून मागितली खंडणी

वनीकरणात समाविष्ट झालेली जमीन विक्री करून, त्याचा सातबारा नावावर करण्यासाठी फसवणूक करीत ७० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या बाबाराजे देशमुख याला पोलिसांनी अटक केली आहे. मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ येथे २०१३ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत ही घटना घडली असून, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Fri, 19 May 2023
  • 01:01 am
वनीकरणाची जमीन विकून मागितली खंडणी

वनीकरणाची जमीन विकून मागितली खंडणी

वनीकरणात समाविष्ट जमिनीची केली बेकायदेशीर विक्री, खरेदीखतासाठी मागितली ७० लाखांची खंडणी

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

वनीकरणात समाविष्ट झालेली जमीन विक्री करून, त्याचा सातबारा नावावर करण्यासाठी फसवणूक करीत ७० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या बाबाराजे देशमुख याला पोलिसांनी अटक केली आहे. मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ येथे २०१३ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत ही घटना घडली असून, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

अभियंता असणारे रवींद्र शिवाजीराव देशमुख (वय ४८, रा. वडगाव बुद्रुक) यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात बुधवारी (१७ मे) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रशांत ऊर्फ बाबाराजे गणपतराव देशमुख (वय ३३, रा. बेबडओव्हळ, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली.

मावळ तालुक्यात बेबडओव्हळमधील गट नंबर १९६ मधील ५ एकर जमीन वनीकरण विभागात समाविष्ट आहे. अशा जागेचे नियमाने प्लॉटिंग होत नाही याची कल्पना असताना देशमुख याने तक्रारदाराला २५ गुंठे जमीन विकली. त्याचा मोबदला म्हणून २५ लाख रुपये रवींद्र यांच्याकडून घेतले. त्यानंतर रवींद्र यांच्या नावाने खरेदीखत करून दिले नाही. तसेच, सुरुवातीला त्यांच्याकडून घेतलेले २५ लाख रुपये परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. तसेच, खरेदीखत करायचे असल्यास आणखी ७० लाख रुपये द्यावे लागतील, अशा स्वरूपाची खंडणी मागितली. त्याचबरोबर पैसे न दिल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास रवींद्र यांना जिवे मारण्याची धमकी देऊन पाच लाख रुपये खंडणी स्वरूपात स्वीकारल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या सगळ्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या पथकाने आरोपी बाबाराजे देशमुख याच्या मुसक्या आवळल्या.

बाबाराजे देशमुख याच्या नावाने सोशल मीडियात अनेक ग्रुप आहेत. तसेच, बाबराजे याने स्वतःचे फोटो, व्हीडीओ व फोन रेकॉर्डिंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केले आहेत. तीन आकडी सातबारा आहे आपला, असे डायलॉग मारून बाबाराजे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करीत असतो. शिरगांव पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story