डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार पित्याचा मृत्यू; मुलगा थोडक्यात बचावला

त्रिवेणीनगरकडून तळवडे जाणाऱ्या रस्त्यावर पुन्हा एकदा अपघात झाला. या घटनेत १२ वर्षीय मुलासह जात असलेला दुचाकीचालक पित्याचा डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडला जाऊन जागीच मृत्यू झाला.

accidentdeath

डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार पित्याचा मृत्यू; मुलगा थोडक्यात बचावला

सीविक मिरर ब्युरो

त्रिवेणीनगरकडून तळवडे जाणाऱ्या रस्त्यावर पुन्हा एकदा अपघात झाला असून, मंगळवारी (१२ डिसेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेल्या घटनेत १२ वर्षीय मुलासह जात असलेला दुचाकीचालक पित्याचा डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडला जाऊन जागीच मृत्यू झाला. यात त्याचा मुलगा थोडक्यात बचावला. 

नवनाथ भानूदास गायकवाड (वय ४०), असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. दीपक नवनाथ गायकवाड (१२, रा. सोनवणे वस्ती, ताथवडे) असे अपघातात बचावलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ गायकवाड हे त्यांचा मुलगा दीपक याच्यासह दुचाकीवरून जात होते. त्यावेळी त्रिवेणीनगर-तळवडे रस्त्यावर भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे नवनाथ हे दुचाकीवरून खाली पडून डंपरसोबत शंभर मीटर अंतरापर्यंत फरपटत गेले. यात डंपरच्या मागच्या चाकाखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला. त्याचवेळी मुलगा दीपक हा दुसऱ्या बाजूला पडल्यामुळे या अपघातातून बचावला.

शनिवारी याच रस्त्यावर एका अपघातात दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. तर अन्य महिला गंभीर जखमी झाली होती. ग्रामस्थांनी येथील अवजड वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण तसेच वाहतूक कोंडी १५ दिवसात न सुटल्यास रस्ता रोको करण्याचा इशारा थेट पोलीस आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून दिला आहे. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा येथे अपघातात दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story