दिवाणी व फौजदारी न्यायालयातील सर्व वकील तसेच कार्यालयीन अधिकारी कर्मचा-यांनी २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावून लोकशाही उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एम.जी.मोरे यांनी केले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे निर्देशानुसार २०६, पिंपरी (अ.जा.) विधानसभा कार्यालयामार्फत मतदान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत पिंपरी दिवाणी व फौजदारी न्यायालयात मतदान जनजागृती करण्यात आली. त्यावेळी सह दिवाणी न्यायाधीश श्री. मोरे बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, स्वीप विभागाचे संदीप सोनवणे, महालिंग मुळे, महादेव डोंगरे तसेच न्यायालयातील वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मोरे यांनी उपस्थितांना लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करण्याची शपथ दिली.
पिंपरी विधानसभा कार्यक्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. गेल्या निवडणूकीत कमी मतदान झालेल्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून त्या ठिकाणी मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
याशिवाय या कार्यक्षेत्रातील सोसायट्या, समाज मंदिरे, प्रवासी वाहतूकीची ठिकाणे यांसह दाट वस्तीच्या व गर्दीच्या ठिकाणी मतदार जनजागृती करण्यात येत आहे. या निवडणूकीत सोसायटयांमध्ये ६ नवीन मतदान केद्रांचा समावेश झाल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होईल असा विश्वास निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी व्यक्त केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.