Ram Mandir Ayodhya : ‘मूठभर वाळूची ढीगभर ताकद’; अयोध्येला गेलेल्या पिंपरी-चिंचवडच्या कारसेवकांनी जागविल्या ३२ वर्षांपूर्वीच्या थरारक आठवणी

देशभरात कारसेवेचे वातावरण... हिंदुत्वाने प्रेरित झालेले तरुण... पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) तब्बल ३०० धर्मवेड्या तरुणांनी थेट अयोध्या गाठली... तेथे गेल्यावर पाच दिवस केवळ शरयू नदीकाठची मूठभर माती गोळा करण्याचे काम मिळाले.

Ram Mandir Ayodhya

अयोध्येला गेलेल्या पिंपरी-चिंचवडच्या कारसेवकांनी जागविल्या ३२ वर्षांपूर्वीच्या थरारक आठवणी

देशभरात कारसेवेचे वातावरण... हिंदुत्वाने प्रेरित झालेले तरुण... पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) तब्बल ३०० धर्मवेड्या तरुणांनी थेट अयोध्या गाठली... तेथे गेल्यावर पाच दिवस केवळ शरयू नदीकाठची मूठभर माती गोळा करण्याचे काम मिळाले... मात्र, या मूठभर मातीने मनात ढीगभर ताकद एकत्र झाली... आणि ६ डिसेंबर १९९२ रोजी या तरुणांनी थेट आपला मोर्चा बाबरी मशीदवर नेला... एका क्षणात या कारसेवकांनी देशभरातील आपल्या हिंदुत्ववादी (Hindu) साथीदारांसह बाबरीपतन केले... या आठवणींना तब्बल ३२ वर्षांनी शहरातील कारसेवकांनी उजाळा दिला आहे. (Ram Mandir Ayodhya)

प्रकाश मिठभाकारे, हेमंत हरहरे, मुकुंद कुलकर्णी, विनायकराव थोरात, मिलिंद देशपांडे, माधव खोत, डॉ. गीता आफळे, डॉ. गिरीश आफळे, ज्योती पठानिया, जितेंद्र महाराज देव, ज्ञानेश्वर शेडगे, अशोक येमार, विलास मडिगेरी, ॲड. एस. बी. चांडक या काही प्रमुख कारसेवकांनी १९९२ मध्ये शहरातील ३०० ते ३५० जणांसह २८ नोव्हेंबरपासून टप्प्या-टप्प्याने अयोध्याच्या दिशेने झेलम एक्स्प्रेसने प्रवास सुरू केला होता.

घरातून निघताना अनेकांनी, भाजी-भाकरी आणि अन्य शिदोरी बांधून घेतली होती. परंतु, १९९० च्या कारसेवेची भळभळती जखम मनात कायम असल्याने महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून अयोध्याला जाणाऱ्या कारसेवकांना विविध रेल्वे स्थानकांवर तेथील स्थानिकांकडून जेवण, पाणी आणि अन्य सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात होता, अशी आठवण यावेळी संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक माधव खोत यांनी सांगितली.

आम्ही पुढील दोन दिवसात अयोध्यात दाखल झालो. तोपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यातून कारसेवकांचा जथ्था गोळा झाला होता. मंदिर वही बनाएंगेसह... विविध घोषणांनी अयोध्या परिसर दणाणून गेला होता. परंतु, कारसेवकांनी रोज शरयू नदीवर जाऊन अंघोळ करायची आणि येताना एक मूठ नदीवरील वाळू आणायची ही जबाबदारी देण्यात आली. बाबरीच्या समोर एक मोठा खड्डा करण्यात आला होता. त्या खड्ड्यात ही वाळू आणून टाकायची एवढंच काम कारसेवकांना सांगण्यात आले होते. आम्हाला एवढ्यासाठी येथे बोलावले आहे का, असा सवाल कारसेवकांनी दोन दिवसांनंतर नेत्यांना विचारण्यास सुरुवात केली होती. चार-पाच दिवस मूठभर वाळू शरयू नदीच्या तीरावरून आणणाऱ्या कारसेवकांच्या मनात ढीगभर ताकद गोळा होत गेली आणि ६ डिसेंबरला कारसेवकांनी बाबरी मशिदीच्या दिशेने कूच केली.

६०-६५ कारसेवकांची एक वाहिनी या पद्धतीने अयोध्याला आलेल्या कारसेवकांचे गट केले होते. प्रत्येक गटावर लक्ष ठेवण्यासाठी एका स्वयंसेवकाला जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे जेव्हा कारसेवकांनी ढाचाच्या दिशेने कूच केली तेव्हा वाहिनीतील काहीजणांनी गावात जाऊन ढाचा पाडण्यासाठी आवश्यक साहित्य म्हणजेच कुदळ-फावडी-पहार गोळा करून आणली होती.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि अन्य नेते ढाचावरून खाली उतरा, तोडफोड करू नका; असे माईकवरून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र कारसेवक कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कारसेवकांचा आवेग प्रचंड वाढला होता. ढाचाच्या घुमटावर चढलेल्यांकडून टिकाऊ पहारीचे घाव घालण्यास सुरुवात झाली, तेव्हा ठिणग्या उडू लागल्या होत्या. परंतु पाडकाम करण्यात अडचणी येत होत्या. तेव्हा अचानक एक घोषणा झाली. कोणत्याही गोष्टीची उभारणी आणि पाडकाम हे पायाच्या बाजूने केले जाते आणि कारसेवकांनी ढाचा पाडण्याकरिता त्याच्या पायावर आणि अन्य बाजूने घाव घालण्यास सुरुवात करून अवघ्या काही मिनिटात एक घुमट जमीनदोस्त केला. त्यानंतर पुढील काही तासांत अन्य दोन घुमटदेखील जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर मात्र, अवघी अयोध्यानगरी आनंदात न्हाऊन निघाली होती.

स्थानिकांनी आपापल्या घराबाहेर रांगोळ्यांचे सडे घालण्यास सुरुवात केली. नागरिकांनी कारसेवेला आलेल्यांना साखर आणि मिठाई वाटण्यास सुरुवात केली. पण तोपर्यंत देशातील वातावरण बदलत गेले आणि प्रत्येक कारसेवकाला आपापल्या मूळ गावी घरी परतण्याची सूचना देण्यात आली. मिळेल त्या रेल्वेने प्रत्येक कारसेवक मिळेल त्या ठिकाणी उभे राहून घराच्या दिशेने निघाला. एका आत्मिक समाधानातून सगळेजण घरी परतत होते. मंदिर होण्यासाठी सगळ्यांना ३२ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. मात्र, आज आम्हाला मंदिर उभे राहिलेले पाहून ३२ वर्षांपूर्वी केलेल्या सेवेचा अभिमान वाढला आहे, अशी भावना यावेळी शहरातील कारसेवकांनी ‘सीविक मिरर’ शी बोलताना व्यक्त केली.

...३२ वर्ष जपली वीट

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिंचवड गावातील ज्येष्ठ स्वयंसेवक पंजाबराव मोंढे यांनी कारसेवेवरून परतताना एक वीट सोबत आणली होती. शहरात अनेक कारसेवकांनी ढाचापतनानंतर सोबत वीट आणि अन्य काही साहित्य घरी आणले होते. मागील ३२ वर्षांपासून हे कारसेवक मोठ्या भक्तिभावाने या आठवणी जपून त्याची विधिवत पूजा करत आहेत.

अवघ्या २२ वर्षांचा असताना मी सहकाऱ्यांसह तेव्हा कारसेवेला गेलो होतो. मूठभर वाळू आणून एका ठिकाणी टाकायला लावली. वाळू टाकायची होती तर आम्हाला का बोलावले, असे म्हणत ६ तारखेला स्वयंसेवकांचा उद्रेक झाला. अवघ्या काही तासात कारसेवकांनी ढाचाचे पतन केले. परतताना आम्हाला रेल्वेच्या दोन डब्यांमधील जागेत उभे राहून काही अंतर यावे लागले. मात्र, पिंपरीत आल्यावर आपल्यावर "रासुका" अंतर्गत कारवाई होईल अशी शंका अनेकांना येऊ लागली. पाच दिवस भूमिगत राहिल्यावर पोलिसांनी मला, अनंतराव कुलकर्णी आणि भाऊ बोराटेंना अटक केली. सात दिवसांनी सुटलो आणि पुन्हा टाटा मोटर्समध्ये कामासाठी रुजू झालो. कालांतराने बाबरी पाडायला गेलेला कामगार नेता झाला. आज मी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. पण कारसेवा ही कोणा पक्षाचे आंदोलन नव्हते. प्रत्येकजण रामासाठी तेथे गेला होता आणि मी त्याचा एक भाग होतो याचे समाधान आहे. 

- एकनाथ पवार, राज्य संघटक शिवसेना

तिघांना झाला होता कारावास

बजरंग दलाचे तत्कालीन शहर प्रमुख एकनाथ पवार, विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन शहर अध्यक्ष अनंतराव कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन जिल्हा संघचालक भाऊ बोराटे या तिघांना बाबरी पतनानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये आल्यावर पाच दिवसांनी अटक करण्यात आली होती. पाच दिवस हे तिघे घरी न राहता भूमिगत होऊन शहरात वावरत होते. कट्टर शिवसैनिक असलेले वसंत तेलंगी हे थेट घुमटावर चढले होते आणि तसे छायाचित्र कालांतराने प्रसिद्ध झाल्याची आठवण यावेळी शहरातील कारसेवक सांगतात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story