Pimpri Chinchwad : मोर्चासाठी पोलिसांचा २० तास खडा पहारा

मराठा समजाच्या आरक्षणाच्या (maratha aarakshan) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवाचा भव्य मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे.

PCMC Police

मोर्चासाठी पोलिसांचा २० तास खडा पहारा

बाराशे पोलिसांचा फौजफाटा सकाळी सातपासून रस्त्यावर; साध्या वेषातील पोलिसांचीही बारीक नजर

मराठा समजाच्या आरक्षणाच्या (maratha aarakshan) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवाचा भव्य मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. दरम्यान, बुधवारी (२४ जानेवारी) पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मराठ्यांचे भगवे वादळ येऊन धडकले. मोर्चा उशिरा शहरात पोहचल्याने सकाळी सहापासून तैनात करण्यात आलेले पोलिस तब्बल वीस तास रस्त्यावर उभे असल्याचे पहावयास मिळाले. (Pimpri Chinchwad)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरातील मराठा बांधव एकवटले आहेत. जालना येथील अंतरवाली सराटी येथून निघालेल्या मोर्चात अबालवृद्ध सहभागी झाले आहेत. दरम्यान, बुधवारी मोर्चेकरी रात्री उशिरा पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले. औंध मार्गे शहरात दाखल झालेल्या मोर्चात शहरातील मराठा बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाला. ज्यामुळे डांगे चौक, चिंचवड परिसर भगव्या रंगाने न्हाऊन निघाला होता.  (PCMC Police) 

एवढया मोठ्या प्रमाणात मराठा बांधव रस्त्यावर उतरल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी साध्या वेशातील पोलिसही तैनात होते. वाहतूककोंडीसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरातील काही रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले होते. सकाळी सहापासून लाठी-काठी-हेल्मेट घेऊन अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचारी रस्त्यावर तैनात करण्यात आले होते.  गुरुवारी पहाटे मोर्चेकरी आयुक्तालय हद्दीच्या बाहेर पडले. त्यामुळे पोलिसांना तब्बल २० तासांच्या पुढे खडा पहारा द्यावा लागला.

गुन्हे शाखाही रस्त्यावर

मराठा बांधवांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सध्या वेशात फिरून गर्दीवर लक्ष ठेवण्याचा टास्क त्यांना देण्यात आला होता.

आमदार, खासदारांच्या घराजवळ विशेष लक्ष..

मराठा समाजाचे आक्रमक तरुण शहरात मोठ्या संख्येत दाखल झाल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आमदार, खासदारांच्या घराजवळ बंदोबस्त तैनात केला होता. 

याव्यतिरिक्त पक्षांची कार्यालये तसेच संवेदनशील ठिकाणीही बंदोबस्त तैनात होता. स्ट्राइकिंग फोर्स प्लाटून, जलद प्रतिसाद पथक आणि दंगल नियंत्रण पथक यासह मुख्यालयाचे प्लाटून रिझर्व्ह ठेवण्यात आले होते.

पोलीस आयुक्तांकडून पाहणी

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी यांनी मोर्चा जाणाऱ्या रस्त्याची पाहणी केली. पोलीस बंदोबस्त व सुरक्षा व्यवस्थेचा चौबे यांनी आढावा घेतला. तसेच, अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी हे पूर्ण मोर्चात बंदोबस्तावर पायी फिरत 'वॉच' ठेवून होते.

मराठा समाजाने काढलेल्या मोर्चा दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी पोलिस तैनात करण्यात आला होता. बुधवारी सकाळी सहापासून पोलिसांना ठरवून दिलेल्या पॉईंटवर हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. याव्यतिरिक्त गुन्हे शाखेचे पोलिसही रस्त्यावर उतरवण्यात आले होते.

-सतीश माने, सहायक आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी, पिंपरी-चिंचवड.

...असा होता पोलीस बंदोबस्त

  अतिरिक्त आयुक्त - १

  पोलिस उपायुक्त - ५

  सहायक आयुक्त - ८

  पोलिस निरीक्षक - ३७

  उपनिरीक्षक/ सहायक निरीक्षक - ११२

  अंमलदार - ९७०

  वॉर्डन - १२१

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story