‘आयसिस’च्या पाच दहशतवाद्यांना शिक्षा: दिल्लीतील ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयाकडून निकाल, पुण्यामधील तरुणीसह दोघांचा समावेश

पुणे : ‘आयसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांना सक्तमजुरी ते वीस वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीमधील ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयाने वेगवेगळ्या कालमांतर्गत ही शिक्षा फर्मावली.

ISIS

संग्रहित छायाचित्र

पुणे : ‘आयसिस’ या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांना सक्तमजुरी ते वीस वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिल्लीमधील ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयाने वेगवेगळ्या कालमांतर्गत ही शिक्षा फर्मावली. यामध्ये पुण्यातील विश्रांतवाडी येथील एका तरुणीसह कोंढव्यातील तरुणीचा समावेश आहे. इस्लामिक स्टेट-खोरासान (आयएसकेपी) या दहशतवादी संघटनेकडून ‘आयसिस’च्या विचारसरणीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतात हिंसाचार घडवून दहशत पसरविण्याचा आरोप या आरोपींवर आहे. ‘आयसिस’च्या (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया) कट्टरवादी विचारधारेचा प्रचार-प्रसार, भारतामध्ये खिलाफत स्थापन करण्याची योजना आखत देशभरात एकाच दिवसात १०० ठिकाणी ‘इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईसद्वारे (आयईडी) स्फोट घडवण्याचा कट रचल्याचा देखील आरोप ठेवण्यात आलेला आहे.

जहानजैब सामी वाणी, त्याची पत्नी हिना बशीर बेग (दोघेही रा. ओखला विहार, जामियानगर), सादिया अन्वर शेख (रा. विश्रांतवाडी) नबील एस. खत्री (रा. कोंढवा), डॉ. अब्दूर बसित रहमान अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. जहानजैब याच्यावर भारतात खिलाफत स्थापन करण्याची योजना आखल्याचा आणि देशभरात एकाच दिवसात १०० ठिकाणी ‘इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस’द्वारे (आयईडी) स्फोट घडवण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्याने ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ कायद्याविरुद्ध सुरू झालेल्या आंदोलनांना उत्तेजन दिले. अनेक तरुणांच्या भावनांचा गैरफायदा घेत त्यांना भडकावले. तर, दुसरी आरोपी हिना बशीर बेग हिला एनआयए कोर्टाने यूएपीए कायद्याच्या कलम ३८ आणि ३९ अंतर्गत दोन गुन्ह्यांसाठी प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावली. ती ‘आयसिस’ची सक्रिय सदस्य होती. भारताविरुद्ध दहशतवादी संघटनेचा अजेंडा पुढे नेण्यासाठी समविचारी व्यक्तींची ओळख करून देण्यासाठी तिने तिच्या पतीला मदत केली होती, असे एनआयने म्हटले आहे. 

तर, पुण्यातून अटक करण्यात आलेली आरोपी सादिया अन्वर शेख हिला देखील यूएपीए कायद्याच्या कलम ३८ (२) आणि ३९(२) अंतर्गत दाखल गुन्ह्यांसाठी प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ती आयसिसची सक्रिय सदस्य होती. तिने अन्य दहशतवादी गटांना आयसिसच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. तिने आरोपी जहानजैब सामी याच्याकडून सुसाईड जॅकेट मिळवण्याचाही प्रयत्न केला होता, असे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. नबील सिद्दिक खत्रीला यूएपीए कायद्याच्या कलम १७, ३८ आणि ३९ च्या अंतर्गत अनुक्रमे १५, ८ आणि ८ वर्षे अशा तींन शिक्षा सुनावण्यात आल्या. आरोपी जहानजैब सामीला शस्त्रास्त्रे खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. जहानजैब सोबत संगनमताने त्याने काही ठिकाणी स्फोटही घडवून आणले होते. त्याला अडीच लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. हा दंड न भरल्यास खत्रीला अतिरिक्त दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

जहानबेग वाणी आणि त्याची पत्नी हिना या दोघांकडून दहशतवादी विचारधारेचा प्रसार आणि देश विघातक कारवाया केल्या जात असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली होती. मार्च २०२० मध्ये दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने (स्पेशल सेल) या दोघांना अटक केली होती. देशातील बड्या शहरांमध्ये १०० ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याचा मोठा कट यंत्रणांच्या तपासात समोर आला होता. पुढे हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात आला होता. ‘एनआयए’ने केलेल्या तपासात पुण्यात राहणाऱ्या सादिया शेख आणि नबील खत्री यांच्याबाबत माहिती समोर आली. या कटात त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. त्यानंतर या दोघांना १२ जुलै २०२० रोजी पुण्यामधून अटक करण्यात आली. त्यांच्याकडे यंत्रणांनी कसून चौकशी करण्यात आली. या तपासात बेंगळुरूमधील डॉ. अब्दूर रहमान ऊर्फ डॉ. ब्रेव्ह याचे नाव निष्पन्न झाले होते. 

डॉ. रहमान याने त्याचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले होते. त्यानंतर, तो ‘आयसिस’च्या दहशतवादी विचारधारेने प्रभावित झाला. त्याने डिसेंबर २०१३ मध्ये ‘सिरिया’मध्ये जाऊन आयसिसच्या अनेक मोठ्या दहशतवाद्यांची भेट घेतली. तेथे प्रशिक्षण घेतले. एवढेच नव्हे तर तो ‘सिरिया’मधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी देखील झाला होता. ‘आयसिस’च्या दहशतवाद्यांच्या उपचारासाठी एक वैद्यकीय अनुप्रयोग आणि लेझर गाइडेड अँटी-टँक मिसाइल ऍप्लिकेशन विकसित करण्यास देखील तो शिकला होता. त्याला ऑगस्ट २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. त्याला अन्य आरोपींनी भडकावता कट्टरवादी बनवले होते.

याप्रकरणात २० मार्च २०२० रोजी एनआयने जहानजेब वाणी, त्याची पत्नी हिना सादिया शेख , नबील खत्री अब्दूर बसित या पाच जणांविरुद्ध दिल्लीतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर १२ जानेवारी २०२१ रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष न्यायालयाने जहानजेब सामीला विविध कलमान्वये दोषी ठरवत २० वर्षांची शिक्षा आणि द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली. तर, त्याची पत्नी हिना बेग हिला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सादिया शेखला सात वर्षे, तसेच नबील खत्री याला आठ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

अब्दुर बसित याला देखील शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्या शिक्षेचा कालावधी न्यायलयीन कैदेत पूर्ण झालेला आहे. त्याने आयसिसच्या दहशवादी विचारधारेचा प्रसार करण्यासाठी जहानबेग याला ‘व्हॉईस ऑफ हिंद’ हे मासिक सुरू करण्यासाठी मदत केली होती. या प्रकरणात देखील डॉ. रहमानविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. या प्रकरणी अद्याप त्याला दोषी ठरवण्यात आलेले नसून शिक्षा सुनावण्यात आलेली नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest