पुणे : आयटी कंपनीच्या ड्यूटी मॅनेजरने लावला ४५ लाखांचा चुना; सहकारी महिलेच्या नावाने तीन बँकांमधून काढले ४५ लाखांचे कर्ज

आयटी कंपनीत एकत्र काम करीत असताना ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीकडून घेतलेल्या कागदपत्रांचा वापर करून तिच्या नावावर तब्बल ४५ लाखांचे कर्ज काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

Pune Crime News

पुणे : आयटी कंपनीत एकत्र काम करीत असताना ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीकडून घेतलेल्या कागदपत्रांचा वापर करून तिच्या नावावर तब्बल ४५ लाखांचे कर्ज काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन वेगवेगळ्या बॅंकांमधून कर्ज काढून आरोपी पसार झाला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आरोपीवर भादवि ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ५ एप्रिल २०१९ ते ८ मे २०२४ या कालावधीदरम्यान विमाननगर येथील बजाज फायनान्स, बंडगार्डनची एचडीएफसी बँक, फूलऱ्टॉन फायनान्स याठिकाणी घडला. 

ध्रुवकुमार विष्णू शर्मा याच्यासह बँकेच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एअर पोर्ट रस्त्यावर राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक समू चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला बालेवाडी येथील ‘व्हेरीटास सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या आयटी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करते. या कंपनीत आरोपी ध्रुवकुमार शर्मा हा देखील नोकरी करीत होता. त्याच्याकडे ड्यूटी मॅनेजर अशी जबाबदारी होती. दोघेही या कंपनीत पाच वर्षांपासून नोकरी करीत होते. त्यांच्यामध्ये चांगली ओळख निर्माण झाली होती. आरोपीने फिर्यादी महिलेला भेटून त्याला पैशांची आवश्यकता असून बँकेचे पाच लाखांचे कर्ज काढणार असल्याचे सांगितले. मात्र, त्याच्या नावावर कर्ज असल्याने बँक कर्ज देणार नाही अशी बतावणी करीत या महिलेच्या नावावर कर्ज काढण्याची विनंती केली. कोविडचा काळ असल्याने त्याचा गैरफायदा आरोपीने घेतला. 

या महिलेला त्याने तिच्या नावावर कर्ज काढतो आणि त्याचे हप्ते मी भरतो अशी बतावणी केली. तिचा विश्वास संपादन करून फिर्यादीकडून पॅन कार्ड, आधार कार्ड, सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट, सॅलरी ब्रेकअप आदी कागदपत्र घेतली. तसेच, या महिलेच्या ईमेलचा पासवर्ड व युजर आयडी ओटीपीकरिता लागणार असल्याची बतावणी करीत घेतला. कर्ज प्रकरणाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत त्याने वेळ मारून नेली. त्यानंतर, विमाननगरच्या बजाज फायनान्स, बंडगार्डनच्या फूलऱ्टॉन फायनान्स आणि एचडीएफसी बँकेच्या क्रेडीट मॅनेजर व अन्य कर्मचाऱ्यांशी संगनमत केले. या महिलेला माहिती पडू न देता तीन बँकांमध्ये तिच्या नावाने बनावट खाती तयार करण्यात आली. या तीन बँकांमधून ४५ लाख ६ हजार ६३१ रुपयांचे कर्ज काढले. त्याकरिता महिलेच्या बनावट सह्या करण्यात आल्या. या कर्जासाठी बनावट कागदपत्र तयार करण्यात आली. तसेच, पगार पावतीमध्ये तिचा पगाराची रक्कम अधिक दाखवीत बनावट पगार पावती तयार करण्यात आली. कर्जाची रक्कम स्वत:साठी वापरल्यानंतर काही महीने त्याने हप्ते भरले मात्र त्यानंतर आरोपीने हप्ते भरले नाहीत. सध्या आरोपी पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest