Pune Crime News: विदेश सहलीच्या नावाने लाखोंची फसवणूक

पुणे : दुबई आणि सिंगापूर येथे सहलीला जाण्यासाठी व्हिसा आणि विमानाचे तिकीटे काढून देण्याच्या बहाण्याने एका खासगी कंपनीमधील उच्च पदस्थ अधिकाऱ्याला लाखोंचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार आरोपीने हरियाणामध्ये बसून केला.

Pune Crime News

विदेश सहलीच्या नावाने लाखोंची फसवणूक

चतु:शृंगी पोलिसांनी केला गुन्हा दाखल

पुणे : दुबई आणि सिंगापूर येथे सहलीला जाण्यासाठी व्हिसा आणि विमानाचे तिकीटे काढून देण्याच्या बहाण्याने एका खासगी कंपनीमधील उच्च पदस्थ अधिकाऱ्याला लाखोंचा गंडा घालण्यात आला. हा प्रकार आरोपीने हरियाणामध्ये बसून केला. ३० सप्टेंबर २०२३ ते ८ मे २०२४ दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

सुमित कर्तारसिंह देशवाल (रा. आदर्श कॉलनी, पलवल, हरियाणा) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संजीवकुमार केसरदास अरोरा (वय ५३, रा. युतिका अपार्टमेंट, विरभद्र नगर, बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. चतु:शृंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरोरा हे सुरक्षादलांसाठी तयार केल्या जाणाऱ्या विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या बड्या कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतात. अरोरा हे आशिया खंड प्रमुख म्हणून काम पाहतात. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने त्यांना पत्नी व मुलाला घेऊन मागील वर्षी सिंगापूर आणि दुबई येथे सहलीला जायचे होते. त्याकरिता ते सहलीसाठी विमानाच्या तिकीटांचे आरक्षण आणि व्हिसा परवानगी यासाठी प्रयत्न करीत होते. त्यांच्या एका मित्राने आरोपी सुमित देशवाल याच्याबद्दल त्याला माहिती दिली. त्याची ट्रॅव्हल कंपनी असून त्याच्याकडून बुकींग करून घेण्याबाबत या मित्राने सुचवले. 

मित्राने दिलेल्या सुमितच्या नंबरवर फिर्यादी यांनी संपर्क साधला. त्यांनी मित्राचा संदर्भ देत बोलणी केली. त्यावेळी त्याने हरियाणा येथे त्याचे ‘रेडी टू फ्लाय हॉलिडेज’ नावाचे ऑफिस असून टुरिस्ट व्यवसाय असल्याची बतावणी केली. त्यांच्याशी गोडगोड बोलून विश्वास संपादन केला. त्यांना सिंगापूर येथे जाण्यासाठी तिकीटे काढून देण्याचे आणि व्हिसा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून ३० सप्टेंबर २०२३ ते ८ मे दरम्यान वेळोवेळी विविध कारणे देत ३ लाख ४५ हजार रुपये उकळले. त्यांच्या नावाने विमानांची तिकिटे आरक्षित करून ठेवल्याचे भासवले. मात्र, विमान कंपनीस पैसे न भरता त्यांची फसवणूक केली. पैसे न भरल्याने ही तिकिटे रद्द देखील झाली. तसेच, व्हिसा काढून देण्याच्या नावाखाली पैसे घेऊनही त्यांचा व्हिसा काढून दिला नाही. 

आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीकडे पैसे परत मागण्यास सुरूवात केली. मात्र, दरवेळी त्याने पैसे देतो असे सांगत वेळ मारून नेली. दरम्यान, फिर्यादी स्वत: हरियाणामधील पलवल जिल्ह्यातील आरोपीच्या घरी गेले. त्यांच्या घरी जाऊन त्यांनी पैसे मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी त्यांना भेटला नाही. त्याच्या पत्नीने देखील आरोपीने अशा प्रकारे अनेकांना फसवल्याची माहिती फिर्यादी यांना दिली. शेवटी फिर्यादी यांना हात हलवत परत यावे लागले. दरम्यान, त्यांनी चतु:शृंगी पोलिसांकडे याबाबत फिर्याद दाखल केली. तपास अधिकारी तथा सहायक निरीक्षक राज केंद्रे यांनी सांगितले की, आरोपीसंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी हरियाणा पोलिसांशी आम्ही संपर्क केला असता त्याच्यावर अशा प्रकारे फसवणुकीचे पांच ते सहा गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सहायक निरीक्षक केंद्रे यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest