Pune Drug Hub : पुणे बनतेय... ड्रग हब

मुंबईपाठोपाठ पुणेही आता ‘कॉस्मोपॉलिटन’ झाले आहे. शहराचे स्वास्थ्य जसे दिवसेंदिवस बिघडत चालले आहे तसेच व्यसनाधिनतेचे प्रमाणही वाढत चालले आहे. अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये झपाट्याने होत चाललेली वाढ चिंताजनक असून पुणे शहर नवे ‘ड्रग हब’ ठरत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Thu, 5 Oct 2023
  • 10:08 am

पुणे बनतेय... ड्रग हब

दहा वर्षातील सर्वाधिक कारवाया यंदा, तब्बल १४ कोटी २१ लाखांचे अमली पदार्थ जप्त

मुंबईपाठोपाठ पुणेही (Pune) आता ‘कॉस्मोपॉलिटन’ झाले आहे. शहराचे स्वास्थ्य जसे दिवसेंदिवस बिघडत चालले आहे तसेच व्यसनाधिनतेचे प्रमाणही वाढत चालले आहे. अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये झपाट्याने होत चाललेली वाढ चिंताजनक असून पुणे शहर नवे ‘ड्रग हब’ (Pune Drug Hub) ठरत आहे.  दिवसेंदिवस घट्ट होत चाललेल्या व्यसनांच्या या विळख्यामध्ये तरुणाई जखडली जात आहे. विशेषत: शहरातील विविध भागात छुप्या आणि उघड पद्धतीने नशेचे साहित्य राजरोसपणे विकले जात असून पोलिसांच्या सातत्याने सुरू असलेल्या कारवायांनाही हे गुन्हेगार जुमानेनासे झाले आहेत.

मागील दहा वर्षांच्या तुलनेत चालू वर्षात तब्बल १४ कोटी २१ लाख २७ हजार ६१५ रुपयांचे सर्वाधिक अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मागील वर्षी तब्बल दहा कोटींचे अमली पदार्थ पुणे पोलिसांनी जप्त केलेले होते. या तस्करीमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टोळ्या सक्रीय आहेत. पुण्यामध्ये दिवसागणिक वाढत चाललेली ही तस्करी मोडीत काढण्याचे आव्हान पोलीस यंत्रणांसमोर आहे.  

मागील दोन दिवसांपासून ड्रग तस्कर ललित पाटील याने ससून रुग्णालयामधून धूम ठोकल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याच्या मागावर पोलिसांची जवळपास १२ पथके लावण्यात आलेली आहेत. परंतु, केवळ ललित पाटीलच नव्हे तर असे अनेक तस्कर सध्या पुण्याच्या ‘मार्केट’मध्ये नावारूपाला येत आहेत. त्यांनी पुण्याच्या महाविद्यालयांसह उच्चभ्रू परिसरात आपले जाळे उभारले आहे. पुण्यात अमली पदार्थांची तस्करी कशी वाढत गेली? त्यांच्या टोळ्या कशा सक्रिय होत गेल्या हे समजून घेणे आवश्यक आहे.

साधारणपणे ९० च्या दशकामध्ये मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांचा पुण्यामध्ये शिरकाव झाला. या टोळ्यांच्या गुन्हेगारीसोबतच अमली पदार्थांची तस्करीही पुण्यामध्ये सुरु झाली. मुंबईतील गुन्हेगारांनी पुण्यामधून काढता पाया घेतल्यानंतर हे प्रमाण कमी झाले. मात्र, या तस्करीमधली संधी ‘नायजेरियन’ नागरिकांनी शोधली. नायजेरियन तरुण या तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याचे चित्र आहे.

दक्षिण आफ्रिका, युरोप आणि एशिया अशा ‘गोल्डन कॉरिडोर’मधून कोकेन, ब्राऊन शुगरसारख्या महागड्या नशेच्या साहित्याची तस्करी केली जाऊ लागली. महाराष्ट्रामध्ये मुंबईपाठोपाठ पुण्यामध्ये सर्वांत जास्त अंमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. मध्यप्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश आणि गोव्यामधून राज्यभर हे विष ड्रग माफिया त्यांच्या 'नेटवर्क'मार्फत पाठवत आहेत. शहरातील काही नामवंत आणि उच्चभ्रु महाविद्यालयांमध्ये शिकायला आलेल्या धनाढ्यांच्या मुलांना 'ड्रग डिलर्स' हेरतात. महाविद्यालयांमध्ये या डिलर्सनी स्वत:चे वेगळे नेटवर्क उभे केलेले आहे. त्यांच्या नेटवर्कमधून या धनाढ्य विद्यार्थ्यांपर्यंत ह्या नशेच्या वस्तू पोचवल्या जात आहेत. शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी असलेल्या तरुणांकडे त्यांच्या पालकांचे लक्ष नसते. आपली मुले कुठे जातात, काय करतात याकडे पहायला पालकांना वेळ नाही. त्यामुळे असे सावज हे डीलर्स शोधत असतात. अंमली पदार्थांच्या सेवनामध्ये सर्वाधिक प्रमाण हे महाविद्यालयीन तरुणांचेच आहे.

आयटी कंपन्यांमध्ये कामाचा मोठा ताण असतो. तसेच, येथील तरूणांना वेतनही चांगले असते. त्यामुळे अनेक तरूण ताण कमी करण्यासाठी व्यसनांच्या आहारी जातात. हे प्रमाण वाढत चालल्याचे चित्र सध्या दिसत आहेत. आयटी क्षेत्राशी संबधित भागातदेखील ड्रग डीलर्सचे नेटवर्क काम करते आहे. यासोबतच कोरेगाव पार्क, मुंढवा, कोंढवा, वानवडी, लष्कर, येरवडा, विमाननगर, बाणेर, हिंजवडी, पाषाण आदी उच्चभ्रू परिसरातील आपापल्या ग्राहकांकडे कोकेन, ब्राऊन शुगर, अफू, चरस यांसारखे नशेचे साहित्य पोचवले जाते. त्यामध्ये आता एमडी अर्थात मेफेड्रोनची भर पडली आहे. मागील तीन वर्षात सर्वाधिक विक्री एमडीची होत असल्याचे समोर आले आहे. चालू वर्षात ६ कोटी ९१ लाखांचे एमडी जप्त करण्यात आले आहे. विविध पार्टी, गेट टुगेडर अशा गोंडस नावाखाली रेव्ह पार्ट्या, हुक्का आणि मद्य पार्ट्या आयोजित केल्या जातात. सोशल नेटवर्किंग साईट्सवर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर सक्रिय असलेल्या तरुणाईपर्यंत ही व्यसनाची साधने पोचवणे त्यामुळे अधिक सोपे होत चालले आहे.  अत्यंत गुप्तपणे सुरु असलेल्या ड्रग डीलिंगला अंकुश घालण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत अनेक बड्या कारवाया पोलिसांनी केलेल्या असल्या तरीदेखील ही तस्करी रोखणे शक्य झालेले नाही.

महाराष्ट्रात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पंजाब, गोवा, मध्यप्रदेश आणि नेपाळमधील बडे तस्कर काम करीत आहेत. पोलिसांच्या अभिलेखानुसार शेवटच्या घटकापर्यन्त अमली पदार्थ पोचविण्यासाठीची 'चेन' काम करते. किरकोळ विक्रेते अथवा मधले डिलर्स इथपर्यंतच पोलीस पोचतात. त्यापुढील 'लिंक एस्टब्लिश' करण्यात पोलीस अपयशी ठरतात.अमली पदार्थांची वाहतूक करण्याकरिता मुख्यत्वे रेल्वेचा वापर केला जातो. त्याखालोखाल ट्रॅव्हल बसचा वापर केला जातो. आलिशान खासगी कारमधूनदेखील ही तस्करी केली जात आहे. या वाहनांची सातत्याने तपासणी होत नसल्याने तस्करांचे फावले आहे. अत्यंत गुप्तपणे ही तस्करी होत असते. पोलिसांच्या मानवी खबऱ्यांचे (ह्युमन इंटेलिजन्स) नेटवर्क तुटल्याने यासंदर्भातील माहिती मिळविण्यात अडचणी येतात.

शहरातील ड्रग तस्करीवर पोलीस बारीक नजर ठेवून आहेत. त्यामुळेच यंदा चालू वर्षात कारवायांचा वेग वाढलेला आहे. या तस्करीमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांची सातत्याने झाडाझडती घेतली जात आहे. मागील दहा वर्षांतील सर्वाधिक उच्चांकी किमतीचे अमली पदार्थ यावर्षी जप्त करण्यात आलेले आहेत. ड्रग माफियांची माहिती घेण्यासाठी आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही खबरे अधिक सतर्क केले आहेत. माहिती मिळताच कारवाई केली जाते. या बाबत समुपदेश करून जागरूकता आणण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

- अमोल झेंडे, उपायुक्त, गुन्हे शाखा

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest