Pune Crime News: ‘रमेश डाईंग’मध्ये चोरी; दोन आरोपींना पोलिसांकडून बेड्या

पुणे : एका माजी कर्मचाऱ्याने साथीदाराच्या मदतीने सदाशिव पेठेतील ‘रमेश डाईंग’मध्ये हात साफ करीत तब्बल साडे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ४ रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास आणि बुधवारी, १० मे रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली.

संग्रहित छायाचित्र

पुणे : एका माजी कर्मचाऱ्याने साथीदाराच्या मदतीने सदाशिव पेठेतील ‘रमेश डाईंग’मध्ये (Ramesh Dyeing) हात साफ करीत तब्बल साडे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ४ रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास आणि बुधवारी, १० मे रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून उपलब्ध माहितीच्या आधारे दोघाजणांना अटक करण्यात आली आहे. 

सलमान मुजावर (रा. दापोडी), निखिल राजाराम पास्टे (वय २१, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रथमेश मिलिंद शहा (वय २८, रा. जयंती बंगला, मोतीबाग सोसायटी, प्रेम नगर, मार्केट यार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश शहा यांचे सदाशिव पेठेत ‘रमेश डाईंग’ नावाने बॅग, ट्रॉली बॅग, उन्हाळी कपडे, छत्री, पावसाळी रेन कोट आदींचे दुकान आहे. तसेच, सदाशिव पेठेतच त्यांचे गोदाम देखील आहे. या गोदामामधून विविध कंपन्या, विविध मॉडेलच्या ३० ट्रॉली बॅग, २६ डफल बॅग, १२ सॅक, ३६ छत्र्या चोरट्यांनी चोरून नेलेल्या होत्या. गोदामाचे कुलूप बनावट चावीच्या सहाय्याने उघडण्यात आले. त्यानंतर हा ३ लाख २८ हजार ४७८ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.  (Pune Crime News)

चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर शहा यांनी विश्रामबाग पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही तपासण्याचे काम हाती घेण्यात आले. आसपास चौकशी करीत असताना शेजारच्या एका व्यापाऱ्याने पोलिसांना महत्वपूर्ण माहिती दिली. या व्यापाऱ्याने दोन तरुणांना शहा यांच्या गोदामामधून बाहेर पडताना पाहिलेले होते. त्याच वेळी पोलिसांना शहा यांनी सांगितले की, सलमान हा त्यांच्याकडे कामास होता. त्याने चोरीचा प्रयत्न केल्याने त्याला काही महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले होते. पोलिसांनी त्याचे छायाचित्र घेऊन ते शेजारच्या व्यापाऱ्याला दाखवले. तेव्हा त्याने त्याला ओळखले. त्यावरून पोलिसांनी त्याला घरामधूनच चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे खास पोलिसी पद्धतीने चौकशी केली असता त्याने साथीदार पास्टे याच्यासह चोरी केल्याची कबुली दिली.  त्यानंतर पास्टे यालाही अटक करण्यात आल्याचे उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी मनोज बरुरे यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest