पुण्यामधून थेट कर्नाटकमधील कत्तलखान्यासाठी उंटांची तस्करी; आठ उंटांना वाचवले, दोघांना अटक

पुण्यामधून थेट कर्नाटकमधील कत्तलखान्यासाठी उंटांची तस्करी केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गोरक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. पिंपरी-चिंचवडमधील रावेतमधून आठ उंट घेऊन कर्नाटककडे निघालेला ट्रक पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आला.

Camel Smuggling Pune

पुण्यामधून थेट कर्नाटकमधील कत्तलखान्यासाठी उंटांची तस्करी

सामाजिक कार्यकर्त्यांच्या माहितीनंतर वेळीच कारवाई

पुण्यामधून थेट कर्नाटकमधील कत्तलखान्यासाठी उंटांची तस्करी केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गोरक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. पिंपरी-चिंचवडमधील रावेतमधून आठ उंट घेऊन कर्नाटककडे निघालेला ट्रक पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आला. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून हा प्रकार १३ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडला.

अरुण कुमार चिनाप्पा  (वय २८, रा. कुदपल्ली, जिल्हा कृष्णागिरी, कर्नाटक) आणि  लखन मगन जाधव (वय ३०, रा. करपटे वस्ती रोड, कलावती मंदिर शेजारी, काळेवाडी फाटा, वाकड) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी कृष्णा तुळशीराम सातपुते (वय २४, रा. गोकुळनगर पठार, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. चिनाप्पा हा ट्रकचालक असून लखन हा उंट सवारीचे काम करतो. फिर्यादी सातपुते हे वारजे परिसरामधील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांना १३ मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी  यांनी फोन करून एका वाहनाबद्दल माहिती दिली. रावेतवरून ट्रक क्रमांक केए ५२, ४३५५ हा निघाला असून त्यामध्ये काही उंट निर्दयतेने कोंबण्यात आलेले आहेत. हे उंट कत्तलीसाठी कर्नाटक येथे नेण्यात येणार असल्याची माहिती स्वामी यांनी दिली.

त्यानंतर फिर्यादी सातपुते व त्यांचे मित्र प्रसाद मारुती दुडे (वय २८, रा. वारजे), अशितोष सुरेश मारणे (वय २७, रा. न-हे), अजय बसवराज भंडारी (वय २८, रा. भुगाव), सागर गोविंद धिडे (वय २८, रा. वारजे) हे सर्वजण मुंबई-बेंगळुरू महामार्गावर वारज्यात असलेल्या आरएमडी कॉलेजसमोर ट्रकची वाट पाहात थांबले होते. रात्री साधारण पावणेदहाच्या सुमारास हा  ट्रक चांदणी चौकाकडून येताना दिसला. या ट्रकचा पाठलाग करीत वडगाव पुलाजवळ हा ट्रक थांबविण्यात आला. ट्रक चालक आणि शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे चौकशी केली असता चालकाने त्याचे नाव अरुण कुमायर चिनाप्पा व शेजारी बसलेल्याने त्याचे नाव लखन जाधव असल्याचे सांगितले.

त्यानंतर ट्रकची तपासणी केली असता त्यात आठ उंट एकत्रित बांधून ठेवल्याचे दिसले. या ट्रकला चारही बाजूंनी ताडपत्री लावून उंट झाकण्यात आलेले होते. या उंटांचे पाय व तोंड निर्दयतेने बांधण्यात आलेले होते. तसेच, ट्रकमध्ये त्यांच्या चारापाण्याची  काहीही व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती. त्यांना जखमा झाल्या होत्या. या कार्यकर्त्यांनी डायल ११२ वर फोन करून पोलिसांची मदत मागितली. थोड्या वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपींकडे उंटांच्या वाहतुकीबाबत विचारणा केली असता त्यांना कोणतीही खात्रीशीर माहिती देता आली नाही. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी हा ट्रक व उंट ताब्यात घेतले. तसेच, दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.

"रावेतवरून कर्नाटक येथे कत्तलखान्यात नेण्यात येत असलेल्या आठ उंटांची सुटका करण्यात आली. सिंहगड रोड पोलिसांनी तक्रारीची तत्काळ दाखल घेत त्वरित कारवाई केली. या आठ उंटांना आता पांजरपोळ येथे ठेवण्यात आले आहे. कार्यकर्त्यांना शिवशंकर स्वामी, ॲड. आशिष बारीक यांनी वेळीच मार्गदर्शन केले."
- शिवराज संगनाळे, सामाजिक कार्यकर्ते

"हे उंट नेमके कत्तलखान्यातच नेण्यात येत होते की अन्य कारणांसाठी याचा तपास सुरू आहे. उंट घेऊन निघालेला व्यक्ती यात्रा किंवा कार्यक्रम, शुटींगसाठीही उंट देतो. याचा सखोल तपास सुरू असून तपासात नेमकी माहिती समोर येईल."
- विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस ठाणे 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest