लेणीसंपन्न मावळ

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याला देदीप्यमान इतिहासासोबतच निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेल्या भूगोलाचेदेखील वरदान लाभले आहे. त्याचबरोबर संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या मंदिरांपासून ते प्राचीन लेण्यांपर्यंत अनेक गोष्टी मावळात आढळतात. यातील बऱ्याच घटकांचं आज जतन-संवर्धन होताना दिसत नाही. काही स्थळे पर्यटनासाठी प्रसिद्ध असली, तरी त्यांची जोपासना हा देखील तेवढाच महत्त्वाचा विषय आहे. मावळ तालुक्यातील लेणे सौंदर्यवैभवाने नटलेले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 10 Jan 2023
  • 02:00 pm
Karle Caves

Karle Caves

ब्राम्ही लिपीतील ३५ लेखांचे कार्ले

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

मौर्य शैलीच्या स्तंभाचे बेडसे

मौर्य शैलीच्या स्तंभाचे बेडसे 

मावळ तालुक्यातील बेडसे गावात ही लेणी आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेतहून पवना धरणाकडे जाताना हे गाव लागते. भारत सरकारने या लेणीला २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. बेडसे येथे सुमारे १५० मीटर लांबीच्या दगडात लेण्यांचा गट खोदला गेला आहे. येथे एक चैत्यगृह, काही विहार, खोदीव स्तूप आणि पाण्याची कुंडे आहेत. हे आद्य कोरीव काम इसवीसन पूर्व पहिल्या शतकातील आहे असे मानले जाते. या लेण्यांना मारकूड असे नाव प्राचीनकाळी होते, असे येथील शिलालेखात कोरलेले दिसते.

बेडसे येथील चैत्यगृह भव्य आहे. त्याची उंची सुमारे २८ फूट आहे. समोरील भागात चार खांबांवर आधारित व्हरांडा आहे. बाजूच्या भिंतींमध्ये खोल्या आहेत. त्यांच्यामागे खोलवर कोरलेले चैत्यगृह आहे. चैत्यगृहासमोरच मध्यभागी चार खांब आहेत. यातील दोन पूर्ण आणि बाजूला दोन अर्धे आहेत. त्यांची रचना अशी आहे की, त्यामुळे या खांबांनी हा तीस फूट लांब आणि १२ फूट रुंदीचा व्हरांडा तोलून धरला आहे, असे दिसते. हे खांब लेण्यांच्या पायांपासून थेट छतापर्यंत जातात. चैत्यगृहात हर्मिकेचा चौथरा आहे. त्यावर ते मोठे घट कोरलेले आहेत. या घटातून अष्टकोनी खांब बाहेर पडलेले दिसतात. याच खांबांच्या शिरोभागी जमिनीच्या दिशेने उमललेल्या कमळाची रचना केलेली आहे. त्यावर एक चौरंग कोरलेला आहे. छताकडे एकदा हर्मिकेच्या चौथऱ्यावर हत्ती, घोडा, बैल या पशूंवर स्वार झालेल्या स्त्री-पुरुषांच्या जोड्या दिसून येतात. अतिशय रेखीव, प्रमाणबद्ध आणि सुंदर असे हे शिल्पकाम केलेले दिसते. त्यांचे सौष्ठव, डोळ्यातील सौंदर्य, अंगावरील मोजकेच पण उठावदार दागिने, आगळी वेशभूषा हे बेडसे येथील वैशिष्ट्यच आहे. या खांबांच्या शीर्षभागावर उमलत्या कमळाचे कोरीव काम आहे. यातील प्रत्येक दल हे स्वतंत्र अगदी त्याच्या त्या मधल्या फुगीर शिरेसह दाखवलेले दिसते. येथे कोरलेल्या हत्तींना सुळे दिसत नाहीत. त्याजागी खोबणी केलेल्या दिसून येतात. त्यावरून तिथे खरे हस्तिदंत बसविले जात असावेत असा अंदाज करता येतो. व्हरांड्याच्या अन्य भागावर चैत्यकमानी, वेदिकापट्टींचे नक्षीकाम केलेले आहे. बेडसे येथील स्तंभ मौर्य शैलीतील आहेत असे मानतात. तसेच त्यांना पर्सिपोलिटन धर्तीचे स्तंभ असेही म्हटले जाते. पर्सिपोलिस हे इराणमधील एक प्राचीन शहर होत. मौर्य साम्राज्याचा संबंध येथपर्यंत होता असे हे स्तंभ दर्शवतात. ही पवन मावळातील सर्वांत प्राचीन लेणी आहे.

वर्षाविहारासाठी प्रसिद्ध असलेली पाल लेणी

वर्षाविहारासाठी प्रसिद्ध असलेली पाल लेणी

नाणे मावळात वर्षाविहारासाठी अनेक स्थळे असून, त्यातीलच एक पाल आहे. त्यासोबतच उकसान गावाला लागून असलेल्या डोंगर-दऱ्यांतून खळखळणारे धबधबे व पुरातन दुर्लक्षित अर्धवट कोरलेल्या लेण्या येथे आढळतात. मावळातील सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात गड-किल्ल्यांची रास असून, पुरातन लेण्यादेखील इतिहासाला साद घालताना दिसतात. पाल व उकसान गावच्या लेण्या कार्ला, भाजे यांसारख्या लेण्यांप्रमाणे प्रसिद्ध नसल्या, तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कामशेत शहरातून नाणेमार्गे गोवित्री गावाच्या पुढे व कुंडलिका नदीच्या अलीकडे उकसान गावाकडे जाण्यासाठी फाटा आहे. उकसान गाव व अलीकडचे पाल गाव येथे जाताना दिसणारी निसर्गसृष्टी पाहिल्यास मन प्रसन्न होते. या गावांच्या तीनही बाजूला वडिवळे धरणाच्या पाण्याचा विळखा असल्याने उंच डोंगरावरून ही गावे धरणातील बेटे असल्याचा भास होतो. उकसान गावाच्या बाजूला असणाऱ्या या डोंगरमाथ्यावर चालत गेल्यास पुढे डोंगराच्या कातळात एक गुहा दिसते. हीच उकसानची लेणी. त्या शेजारीच एक सुंदर धबधबा असून, गावातील प्राथमिक शाळेपासूनही हे मनोहर दृश्य दिसते. ही लेणी मुखाला ८ फूट उंच व ९ फूट रुंद असून यात प्रवेश केल्यास आत मोठी गोलाकार गुहा कोरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. याचप्रमाणे पाल लेणी देखील अर्धवट कोरलेली असून, या लेणीमधील गुहेत एक विहार व बसण्यासाठी एक सज्जा कोरला आहे. या गुहेच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर एक शिलालेख असून, ब्राह्मी लिपितल्या या शिलालेखाची सुरुवात 'नमो अरिहंतान' ने होते.

भाजेची प्राचीन बुद्ध लेणी

भाजेची प्राचीन बुद्ध लेणी 

मावळ तालुक्यातील भाजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन बौद्ध लेणी आहेत. येथील चैत्यगृह महत्त्वपूर्ण आहे. बाजूला भिक्खूंना राहण्यासाठी खोल्या आढळतात. येथे २२ लेणी आढळतात. एक चैत्यगृह व २१ विहार आहेत. या लेणीमुळे महाराष्ट्र राज्याला खूप पर्यटक मिळतात . येथे रोज एक लाख ते दोन लाख पर्यटक येतात. येथे चैत्य गवाक्षांच्या माळा आहेत. त्यांना लागून कोरीव सज्जे बनवलेले आहेत. यातील काही सज्जांवर कोरीव कामातून जाळी आणि पडद्याचा भास निर्माण केलेला आहे. वेदिकापट्टीवर नक्षीदार कोरीव काम आहे. दगडात कोरून काढलेल्या कड्या आहेत. या ठिकाणी गवाक्षातून युगुले कोरलेलीही दिसून येतात. तसेच येथे एक यक्षिणी कोरलेली आहे. या यक्षिणीच्या हातात धरलेले झाड आजही स्पष्ट दिसते. कातळात एक चैत्यकमान कोरली आहे. या कमानीला एकूण १७२ छिद्रे पाडलेली आहेत.

येथील चैत्य सुमारे १७ मीटर लांब, ८ मीटर रुंद आणि तितकेच मीटर उंच आहे. त्यात सत्तावीस अष्टकोनी खांब आणि मधोमध स्तूप आहे. या खांबांवर कमळ, चक्र अशी चिन्हेही कोरलेली आहेत. एका ठिकाणी एक खुंटी आणि तिला अडकवलेला फुलांचा हार कोरलेला आहे. स्तूपापाठीमागील खांबांवर बुद्धाची पुसटशी चित्रे दिसून येतात.

चैत्यगृहाला लाकडी तुळ्यांचे छत आहे. या तुळ्यांवर ब्राह्मी लिपीतील लेख आहेत.

येलघोल लेणी

येलघोल लेणी

येलघोल हे मावळ तालुक्यातील एक छोटेसे गाव आहे. एका प्राचीन ठेव्यामुळे हे गाव हळूहळू भटकंतीच्या नकाशावर येऊ लागले आहे. या येलघोल गावात एक प्राचीन लेणे लपलेले आहे. महाराष्ट्रात ज्या – ज्या अर्धवट गुहा, लेण्या सापडतात त्यापैकीच एक लेणी म्हणजे हे येलघोल. येथे प्राचीन काळी एक लेणं एक सुंदर निर्मिती होता होता राहिलं. याचं आणखी एक दुर्दैव म्हणजे, या लेण्याचा उल्लेख कुठल्याही पुस्तकात अथवा शासनाच्या गॅझेटमध्ये सापडत नाही. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील कामशेत येथून पवन-मावळातील कडधे नावाचे गाव येथे येण्यासाठी गाठावे लागते. कडधेवरून येलघोल गावात येता येते. येलघोल गावाजवळ म्हणजे काही किलोमीटर अंतरावरच तिकोणा, बेडसे आणि घोरावडेश्वर या लेण्यांच्या खाणाखुणा आहेत. त्यामुळे या भागातदेखील त्याच काळात अशा लेण्यांचे खोदकाम झाल्याचे अनेक अभ्यासकांचे मत आहे. गावापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर ही लेणी आहे. साधारण अर्ध्या-पाऊण तासात आपण येलघोलच्या लेणीपाशी पोहोचतो. येथे पोहोचल्यावर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ही लेणी एका नैसर्गिक कपारीत अथवा घळीतच असून, त्याच्या अगदी शेजारून एक धबधबा लेणीसमोरच कोसळतो. यामुळे हे दृश्य पावसाळ्यात खूपच सुंदर दिसते. पूर्वेस तोंड करून असलेल्या या लेणीच्या उजव्याच बाजूला एका दगडात कोरलेला स्तूप दिसतो. साधारण पाच फूट उंचीचा हा स्तूप आहे, तसेच डाव्या बाजूला खोल्यांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत दिसते. तसेच लेण्याच्या मध्य भागावरील भिंतीवर बऱ्याच मानवी आकृत्या कोरलेल्या दिसून येतात. कुतूहल चाळविणाऱ्या या आकृत्यांचे प्रयोजन काय? तसेच यांची निर्मिती कोणत्या काळातील आहे याबद्दल कसलीही माहिती मिळत नाही. त्यामुळे यांचे संशोधन होणे अत्यंत गरजेचे आहे.

ब्राम्ही लिपीतील ३५ लेखांचे कार्ले

ब्राम्ही लिपीतील ३५ लेखांचे कार्ले 

कार्ले लेणी हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून, त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. ही लेणी प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जात असे. बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफा पुणे जिल्ह्यात मळवलीपासून (लोणावळा) ४-५ कि.मी. अंतरावर आहे. ६ किलोमीटर अंतरावर लोणावळ्यानजीक आहेत. येथील चैत्यगृहाचे स्थापत्य शिल्पे सुंदर आहेत. कार्ले गुंफा ह्या बोरघाटात स्थित आहेत. बोरघाट सातवाहनकालीन प्राचीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणांहून तेर या प्राचीन ठिकाणास जाण्याच्या मार्गावर आहे. इ.स.पू. पहिले शतक ते इ.स. पाचवे शतक या काळात ही लेणी खोदली गेलेली आहे. भारत सरकारने या लेणीला २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. कार्ला गुंफांमध्ये कदाचित सर्वांत जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृहे आहेत. चैत्यगृहाच्या दाराशीच डाव्या हाताला एक सिंहस्तंभ कोरलेला आहे. भारतात अशोकाने असे स्तंभ उभे केले होते. या मालिकेतील सारनाथच्या धर्तीवर हा इथला सिंहस्तंभ कोरला आहे. हा स्तंभ ४५ फूट उंचीचा आहे. त्याची बैठक वर्तुळाकार, आणि अंग सोळा कोनांमध्ये घडवलेले आहे. या स्तंभाच्या अग्रभागी एक वर्तुळाकार कळस दिसून येतो. त्यावर आमलक, हर्मिकेचा चौथरा आहे. या संचावर चार सिंहाची आकृती कोरलेली आहे. या स्तंभाचा करविता ‘महारठी अग्निमित्रणक याच्या दातृत्वाचा भाषेतील लेख दिसतो.

चैत्यगृहाच्या उजव्या बाजूसही पूर्वी स्तंभ आणि त्यावर चक्र असावे असे अभ्यासकांना वाटते. याची एक सूचक शिल्पाकृती चैत्यगृहातील एका खांबावर काढलेली आहे. इथे सिंह आणि चक्र असलेल्या खांबांमध्ये स्तूप दिसत आहे. याशिवाय या चैत्यगृहाचे कान्हेरीच्या चैत्यगृहाशी साम्य असल्याचे दिसते कारण तेथेही असे दोन्ही स्तंभ दाखवलेले आहेत. चैत्यगृहाबाहेर सज्जा कोरलेला आहे. येथे मिथून शिल्पाच्या जोड्या, हत्तींचे थर, गौतम बुद्धांचे त्यांच्या अनुयायांसह असलेले शिल्पपट, चैत्यकमानी आदी गोष्टी दिसून येतात. चैत्यगृहाच्या सज्जात या लेण्याच्या करवित्याचा लेख आहे. ‘वेजयंतितो सेठीना भूतपालेन सेलघरम परिनिठापितम् जंबुदिपम्ही उतमम्’ वैजयन्तिचा श्रेष्ठी भूतपाल याने तयार केलेले हे लेणे जम्बुद्वीपात उत्कृष्ट आहे, असा याचा अर्थ होतो. कार्ल्याच्या या लेण्यांमध्ये ब्राह्मी लिपीतले ३५ लेख दिसून आले आहेत. यातील बहुतेक दानधर्मविषयक आहेत.

घोरावडी लेणी

घोरावडी लेणी

या लेणीला शेलारवाडी लेणी किंवा घोरावडी लेणी असे म्हणतात. ही महाराष्ट्रात पुणे शहराजवळच्या शेलारवाडी आणि घोरावडी गावांजवळआहे. लेणी समुद्रसपाटीपासून ४५० ते ५०० मी उंच असलेल्या या डोंगरात आहेत. वर जायला खड्या चढणीच्या पायऱ्या आहेत. येथे ९-१० बौद्ध लेणी असून, त्या इ.स.पूर्व पहिल्या ते इ.स.नंतरच्या पहिल्या शतकाच्या काळात खोदल्या गेल्याची शक्यता आहे. या लेण्यांमध्ये एक शिवमंदिरही आहे. याला घोरावडेश्वर असे नाव आहे. येथे एक चैत्यगृह आणि विहार आहेत. यांची रचना साधी असून थोडेसे नक्षीकाम आहे. एका विहारात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत.

 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story